इस्लामपूर : इस्लामपूर-साईनगर येथील हानिफाबी मदनसाब मुल्ला (वय 65) या शेतमजूर महिलेचा डोक्यात व तोंडावर वर्मी घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री कापूरवाडी (ता. वाळवा) येथील एका ओघळीत मुल्ला यांचा मृतदेह आढळून आला. खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. रात्री उशिरापर्यंत इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, इस्लामपूर साईनगर येथे हानिफाबी मुल्ला या मुलगा मलिक व सून तसलीम यांच्यासह राहत होत्या. मुल्ला कुटुंबीय रोजंदारी करून उदरनिर्वाह करते. हानिफाबी याही शेतमजुरी करत होत्या. काही दिवसांपासून त्या कामाला गेल्या नव्हत्या. मंगळवार, दि. 3 जूनरोजी सकाळी 8 च्या सुमारास एक व्यक्ती दुचाकी घेऊन त्यांच्या घरी आली होती. हानिफाबी त्याच्याबरोबर दुचाकीवर बसून बाहेर पडल्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह कापूरवाडी येथील ओहोळीत काही शेतकर्यांना दिसला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मुल्ला यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मुल्ला यांच्या डोकीत व तोंडावर गंभीर वार होते. रात्री उशिरापर्यर्ंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.