सांगली

बिसूरमध्ये बिबट्याची भीती

Arun Patil

सांगली, पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात कर्नाळ (ता. मिरज) येथे दर्शन दिलेला बिबट्या सोमवारी रात्री बिसूरमध्ये दाखल झाला. कर्नाळ-बिसूर रस्त्यावरील एका घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तो चित्रीत झाला आहे. त्यामुळे रात्रभर ग्रामस्थांनी गस्त घातली. वन विभागाचे पथकही दाखल झाले आहे.

कर्नाळमधील हायस्कूल परिसरात शेवाळे मळा आहे. या मळ्यापासून एक ग्रामस्थ गेल्या आठवड्यात रात्री नऊ वाजता शेतात पिकांना पाणी घालण्यासाठी निघाला होता. त्यावेळी शेताकडेला अंधारात लपून बसलेल्या बिबट्याने शेतकर्‍यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. बिबट्याने त्यांचा पाठलागही केला. मात्र हा शेतकरी सुदैवाने बचावला होता. आणखी दोन ग्रामस्थांवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वन विभागाचे पथक व सांगली ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. वन विभागाने काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मंगळवारी सकाळपासून बिबट्याचा शोध सुरू होता. परंतु पुन्हा तो कोणालाच दिसला नाही.

सोमवारी रात्री हाच बिबट्या कर्नाळ रस्त्यावरून थेट बिसूर गावात दाखल झाला. साधारपणे तीन वर्षाचा हा बिबट्या असण्याची शक्यता आहे. एका बंगल्याबाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तो चित्रीत झाला आहे. मध्यरात्री हा बिबट्या रस्त्यावरून बिनधास्तपणे चालत असल्याचे दिसून येते. पोलिस व वन विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे.

पथकाने सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज पाहून ताब्यात घेतले. ज्या परिसरात बिबट्या दिसला तिथे पिंजरे लावण्यात आले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी ऊसक्षेत्र परिसरात बिबट्याचा शोध सुरू ठेवला आहे. दिवसभर शोध मोहीम सुरू होती.

शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी : वन विभाग

शेतकर्‍यांनी रात्रीच्यावेळी शेतात पाणी पाजण्यासाठी जाऊ नये. लहान मुलांना घराबाहेर सोडू नये. ग्रामस्थांनीही एकटे घराबाहेर पडू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. कर्नाळमधून तब्बल आठ दिवस या बिबट्याने उसाच्या शेतातून प्रवास केला असण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT