Father Son Ended Life Soni Village Pudhari Photo
सांगली

मन हेलावणारी घटना ! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलानेही संपवली जीवनयात्रा; लग्नाचा वाद ठरला निमित्त...

Father Son Ended Life Miraj | मुलगा इंद्रजीत याचा विवाह गेल्या महिन्यातच झाला होता, मात्र, हे लग्न त्याच्या पसंतीचे नसल्याने तो नाराज होता

पुढारी वृत्तसेवा

मिरज : एका महिन्यापूर्वी ज्या घरात सनई-चौघडे वाजत होते, त्याच घरावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिरज तालुक्यातील सोनी येथे मनासारखे लग्न न झाल्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून बाप-लेकाने एकापाठोपाठ जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

गणेश हिंदुराव कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे (वय २२) अशी मृत बाप-लेकाची नावे आहेत.

असा घडला दुर्दैवी प्रसंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत याचा विवाह गेल्या महिन्यातच झाला होता. मात्र, हे लग्न त्याच्या पसंतीचे नसल्याने तो नाराज होता. याच कारणावरून वडील गणेश आणि मुलगा इंद्रजीत यांच्यात सातत्याने वाद सुरू होते. गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. शुक्रवारी (दि.4) सकाळी बाप-लेकातील हा वाद विकोपाला गेला. या तणावातून वडील गणेश कांबळे यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गावात खळबळ उडाली.

वडिलांचा मृतदेह पाहताच मुलानेही मृत्यूला कवटाळले

गणेश कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना, वडिलांच्या मृत्यूचा धक्का इंद्रजीतला सहन झाला नाही. वडिलांचा मृतदेह पाहून तो पूर्णपणे खचला आणि त्याच ठिकाणी त्यानेही विषारी औषध प्राशन केले. उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. मिरज शासकीय रुग्णालयात बाप-लेकावर एकाच वेळी शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने संपूर्ण सोनी गावावर शोककळा पसरली आहे. एका क्षुल्लक कौटुंबिक वादाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT