पुणे-मिरज मार्गावर शेतकर्‍यांचा रेल रोको Pudhari Photo
सांगली

पुणे-मिरज मार्गावर शेतकर्‍यांचा रेल रोको

6 तासांनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित वेळापत्रक कोलमडले

पुढारी वृत्तसेवा

मिरज/पलूस/भिलवडी : पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर तब्बल सहा तास ठिय्या मारत शेतकर्‍यांनी रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे पुणे ते मिरज डाऊन रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. शेतकर्‍यांनी सुरुवातीला डिझेल वॅगन, त्यानंतर पुणे-कोल्हापूर डेमू रोखली. या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक रात्री उशिरापर्यंत विस्कळीत झाली होती. गुरुवार, दि. 15 रोजी वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामध्ये वसगडे (ता. पलूस) येथील शेतकर्‍यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. परंतु जमीन अधिग्रहित करूनदेखील अनेक शेतकर्‍यांना अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. तसेच रेल्वे मार्गालगत असणार्‍या शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी सेवा रस्ता दिलेला नाही. त्यामुळे पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणात बाधित झालेल्या शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी वसगडे येथील शेतकरी गेल्या चार ते पाच वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. यासाठी रेल्वे प्रशासनाला अनेकदा ‘रेल रोको’चा इशारादेखील दिला होता. दीड वर्षापूर्वीही आंदोलक शेतकर्‍यांनी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस तब्बल चार तास रोखून धरली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने वसगडे येथे धाव घेत, बाधित शेतकर्‍यांना मोबदला देऊ, तसेच सेवा रस्त्यासाठी पुण्यात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन स्थगित केले होते.

त्यानंतर आंदोलक शेतकरी, जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्या चार बैठका झाल्या; परंतु या बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांनी देखील रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी नोटीस पाठवून, आंदोलक शेतकर्‍यांचा विषय मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु रेल्वे प्रशासनाने याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नव्हता.

एप्रिलमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक झाली. यावेळी शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईसाठी 5 मेपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश रेल्वेला देण्यात आले होते; परंतु या प्रस्तावालादेखील रेल्वेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. तरीदेखील रेल्वे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने न घेतल्याने मंगळवारी दुपारपर्यंत शेतकर्‍यांनी रेल्वे प्रशासनाला मागण्या मान्य करण्यासाठी मुदत दिली होती.

तरीही रेल्वेने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी शेतकर्‍यांनी पुणे ते मिरज डाऊन रेल्वे मार्गावर ठिय्या मारत रेल रोको आंदोलन सुरू केले. सुरुवातीला पुण्याहून मिरजेकडे येणारी डिझेल वॅगन शेतकर्‍यांनी रोखली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शेतकर्‍यांनी डिझेल वॅगन सोडून दिली. त्यानंतर मात्र पुणे-कोल्हापूर डेमू शेतकर्‍यांनी रोखून धरली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी भिलवडी पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु जमीन आमची आहे, आमच्या जमिनीत रेल्वेने अतिक्रमण करत रेल्वेमार्ग टाकला आहे, आम्ही आमच्या हक्काच्या जमिनीमध्ये आंदोलन करीत आहोत, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. तसेच रेल्वेचे अधिकारी जोपर्यंत जागेवर येत नाहीत, तोपर्यंत रेल रोको आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा दिला.

रात्री उशिरा आंदोलनस्थळी उपस्थित अधिकार्‍यांनी, गुरुवारी वरिष्ठांसमवेत बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यानंतर डेमू गाडी पुढे मार्गस्थ झाली.

रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली

वसगडे येथे रेल रोको आंदोलन सुरू झाल्यामुळे पुणे ते कोल्हापूर डेमू, सातारा ते दादर व्हाया पंढरपूर एक्स्प्रेस, मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन ते वास्को गोवा एक्स्प्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस, वटवा - हुबळी एक्स्प्रेस, पुणे ते कोल्हापूर विशेष एक्स्प्रेस, कोल्हापूर ते मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, उदयपूर ते मैसूर हमसफर एक्स्प्रेस, अजमेर ते मैसूर उन्हाळी विशेष, श्री गंगानगर ते तिरुचिरापल्ली हमसफर एक्स्प्रेस या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.

कोयना, दादर एक्स्प्रेस सहा तासापासून भिलवडी स्थानकात

मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस आणि सातारा ते दादर व्हाया पंढरपूर एक्स्प्रेस सहा तासापासून भिलवडी तालुक्यातच थांबून होत्या, तर वटवा ते हुबळी विशेष एक्स्प्रेस किर्लोस्करवाडी स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. तसेच अन्य रेल्वेगाड्याही विविध स्थानकांमध्ये थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

प्रवाशांचे अतोनात हाल

वसगडे येथे शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू झाल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या सहा तास एकाच ठिकाणी थांबून होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पुणे ते कोल्हापूर डेमू मध्येच थांबवण्यात आली. त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले होते. अखेर आंदोलक शेतकर्‍यांनीच पुढाकार घेत रेल्वे प्रवाशांची खाण्या-पिण्याची सोय केली.

शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत

दुहेरीकरणाच्या मार्गात बाधित झालेल्या शेतीचा मोबदला मिळावा, यासाठी शेतकरी चार ते पाच वर्षांपासून रेल्वे प्रशासनाशी लढा देत होत; परंतु रेल्वेकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे शेतकर्‍यांनी रेल रोको आंदोलन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT