जत शहर : तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना वेग आला आहे. सध्या आंतरमशागत, खत आणि फवारण्यांची कामे वेगात सुरू आहेत. तालुक्यातील शेतकर्यांसमोर मजुरांची टंचाई आणि वाढलेल्या मजुरीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मजुरांना मिळणारी रोजंदारी वाढवून दिली तरीही, वेळेवर मजूर न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्रातील पाऊस मोठा पडला नाही. मात्र रिमझिम पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात तण उगवले आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर एकाचवेळी द्राक्षबागांचे, तूर, मका, उडीद पिकातील वाढलेले तण काढणे ही सर्व कामे असल्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मजुरांची मजुरीही वाढविली आहे. मजुरांअभावी शेतकर्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, तर काही ठिकाणी घरातील मंडळीच आता शेतात कामे करीत असल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे काही शेतकरी स्वत:च तणनाशकाची फवारणी करीत आहेत. मशागतीचा खर्च वाढत असल्याने पिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे.
सध्या शेतीकामासाठी एका दिवसाची मजुरी 400 ते 600 रुपयांपर्यंत द्यावी लागते. पुरुष मजुरांसाठी दुपारपर्यन्त 500, तर दिवसभर 600 रुपये; तर स्त्रियांसाठी 400 ते 500 रुपये मजुरी द्यावी लागत आहे.
ग्रामीण भागातून तरुण वर्ग रोजगारानिमित्त शहरांकडे मोठ्या संख्येने स्थलांतर करत आहे. तसेच बांधकाम क्षेत्रात रोज 800 ते 1000 रुपये मजुरी मिळते. त्यामुळे मजुरी करणारे लोक शेतात काम न करता शहरात जाऊन विविध ठिकाणी काम करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे.
पावसामुळे शेतात तण उगवले. अनेक ठिकाणी आंतरमशागतीची कामे थांबली व लांबणीवर पडली. आता पाऊस थांबताच ही कामे एकाचवेळी आली आहेत, ज्यामुळे मजुरांची मागणी वाढली. कर्नाटकातील सीमावर्ती गावांतून मजुरांची टोळी बोलावून कामे करावी लागत आहेत. गाडीची व्यवस्था करून मजुरांना आणावे लागत आहे.बसवराज घेज्जी, भीमराव हल्याळ, शेतकरी बिळूर