पलूस ः पलूस तहसीलदार व मंडल अधिकार्यांनी 7/12 वर विरोधकाच्या नावाची नोंद करून त्यांना एकतर्फी कब्जा दिला. न्यायालयाचा आदेश डावलून विरोधकाला कब्जेपट्टी दिल्याचे भासवून शेतातील उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवून लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आले. याप्रश्नी आपली दाद घेतली जात नसल्याचा आरोप करीत प्रल्हाद वसंत शिंदे व माजी सैनिक हणमंत वसंत शिंदे या शेतकर्यांनी पलूस तहसीलसमोर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमावेळी अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस व तहसीलच्या कर्मचार्यांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
सांडगेवाडी (ता. पलूस) येथील प्रल्हाद वसंत शिंदे, त्यांचे भाऊ माजी सैनिक हणमंत वसंत शिंदे व कुटुंबीय तहसील कार्यालयासमोर रविवारी तहसील कार्यालय आवारात आत्मदहन करण्याच्या उद्देशाने आले होते. प्रल्हाद शिंदे व हणमंत शिंदे यांनी अंगावर डिझेल ओतून घेऊनच तहसील परिसरात प्रवेश केला. यावेळी तहसील परिसरात कडक पोलिस बंदोबस्त होता. परंतु त्यांनी पोलिसांना चकवा देत तहसील आवारात प्रवेश केला. यावेळी पोलिस व आंदोलकांची जोरदार झटापट झाली. यावेळी शिंदे बंधूंनी पलूस पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी अरेरावी करीत तक्रार घेतली नाही, तसेच अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला.
प्रल्हाद शिंदे व हणमंत शिंदे यांच्या जमिनीबाबत पलूस दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे. तहसील कार्यालयात देखील सुनावणी सुरू होती. परंतु तहसीलदारांनी एकतर्फी निकाल दिला. पलूसचे मंडल अधिकारी वाल्मिक कोळी यांनी 7/12 पत्रकी विरोधकाच्या नावाची नोंद करून, एकतर्फी कब्जा देण्याचा प्रयत्न केला. यावर उच्च न्यायालयातून तहसीलदारांच्या कार्यवाहीस स्थगितीचा आदेश आणला असता, मंडल अधिकार्यांनी तो स्वीकारला नाही. न्यायालयाचा आदेश डावलून विरोधकाला कब्जेपट्टी दिली. उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवून लाखो रुपयांचे नुकसान केले. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप प्रल्हाद शिंदे यांनी केला. तहसीलदार दीप्ती रिठे यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. आंदोलक शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्या सर्व मागण्या प्राधान्याने सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकर्यांनी घेतला आहे.