मांगले : जांभळेवाडी (ता. शिराळा) येथे कडबा कुट्टी मशिनमधून विजेचा जोरदार धक्का बसल्याने शंकर भीमराव मांगलेकर (वय 37, रा. जांभळेवाडी) या शेतकर्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, 15 जून रोजी दुपारी अडीच वाजता घडली.
शंकर मांगलेकर यांचा जांभळेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे, घराशेजारी जनावरांचा गोठा आहे. रविवारी सकाळी त्यांनी शेतातून जनावरांसाठी वैरण आणली आणि त्याची कुट्टी करून ठेवली होती. दुपारी अडीचच्या सुमारास ते जनावरांना चारा देण्यासाठी गोठ्यात गेले. कडबा कुट्टी मशिनजवळ वाकून कुट्टी केलेला चारा टपामध्ये भरत असताना, त्यांचा स्पर्श कडबा मशिनला झाला. मशिनमध्ये वीजप्रवाह सुरू असल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
थोड्या वेळाने त्यांची आई हौसाबाई आणि शेजारी संजय उपलाने व आनंदा जाधव गोठ्यात आले. त्यांनी शंकर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही विजेचा धक्का बसला. त्यांनी तत्काळ वीजप्रवाह बंद करून शंकर मांगलेकर यांना बाजूला घेतले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद शिराळा पोलिसात आहे.
मृत शंकर मांगलेकर हे शेतकरी होते. तसेच, आचारी म्हणूनही ते काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबास धक्का बसला आहे.