तासगाव : पुणदी (ता. तासगाव) येथे शेतातील पालापाचोळा पेटवताना अचानक उसाच्या पाल्याला आग लागल्याने, आगीत होरपळून वृद्ध शेतकऱ्याचा अंत झाला. ही घटना शनिवार, दि. 11 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. हिंदुराव मारुती सूर्यवंशी (वय 85) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची तासगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, पोलिस पाटील प्रवीण सूर्यवंशी यांनी याबाबत वर्दी दिली आहे.
पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुराव सूर्यवंशी यांचा चुंबळे मळा परिसरात मळा आहे. शनिवारी सकाळी ते शेतातील कचरा आणि पालापाचोळा जाळण्यासाठी गेले होते. त्यांनी कचरा पेटवला असता, शेजारीच असलेल्या त्यांच्या उसाच्या फडातील कुट्टी केलेल्या पाल्याने अचानक पेट घेतला. उन्हाचा तडाखा आणि सुसाट वारा यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. अशा परिस्थितीत हिंदुराव हे एकटेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.
उसाच्या फडातील ठिबक सिंचनची पाईप ओढण्यासाठी ते आत गेले असता, त्यांचा पाय पाईप आणि पाल्यामध्ये अडकल्याने ते खाली पडले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग चोहोबाजूंनी पसरली आणि त्यांना बाहेर पडता आले नाही. धुराचे लोट आणि आगीच्या तीव्र ज्वाळांमुळे त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही.
घटनेच्या तासाभरानंतर शेजारील शेतकरी मोटर सुरू करण्यासाठी तिथे गेले असता, त्यांना उसाच्या फडाला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना दिली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला असता, हिंदुराव यांचा जळालेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे पुणदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.