kidnapping Pudhari
सांगली

Fake kidnapping: पाच वर्षांच्या चिमुरडीच्या ‌‘अपहरणा‌’चा बनाव उघड

आईनेच रचला खोटा कट; कुरळप पोलिसांच्या तत्परतेने बालिका सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

कुरळप : कार्वे (ता. वाळवा) येथील पाच वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले होते. मात्र कुरळप पोलिसांच्या यशस्वी तपासानंतर या प्रकरणाचा थरारक खुलासा झाला असून, अपहरणाचा हा सगळा प्रकार बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. चिमुरडीच्या आईनेच हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी आर्यन्सी प्रकाश चव्हाण (वय 5) ही कार्वे (ता. वाळवा) येथील घरासमोरून अचानक बेपत्ता झाली. याबाबत तिचे आजोबा कृष्णात शंकर पाटील यांनी कुरळप पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांना दि. 9 फेब्रुवारीरोजी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाआधारे आर्यन्सीबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. अपहृत मुलगी शास्त्रीनगर, मलकापूर (ता. कराड) येथे असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली, पथक तत्काळ रवाना झाले. संबंधित ठिकाणी छापा टाकताच चिमुरडी आर्यन्सी सुखरूप आढळून आली. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी सुरू केली असता, आर्यन्सी हिला कोणी पळवून नेले नव्हते, तसेच बिबट्याचाही काही संबंध नव्हता. उलट तिची आई शिवानी प्रकाश चव्हाण (वय 24) हिनेच मुलीला ओळखीच्या नातेवाईकाकडे पाठवून दिले होते. त्यानंतर ‌‘अज्ञात व्यक्तीने किंवा बिबट्याने पळवून नेले‌’ अशी खोटी माहिती देत बनाव रचला असल्याचे उघड झाले.

चंद्रकांत कोळी, संदीप पाटील, कौस्तुभ पाटील, शुभम पाटील, राहुल पाटील आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT