सांगली : कवठेमहांकाळ येथे आयकर विभागाचा छापा असल्याचे भासवून एक कोटी 20 हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केलेले तोतया अधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली.
कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर आयकर विभागाच्या तोतया अधिकार्यांनी छाप्याचा बनाव केला होता. डॉ. म्हेत्रे यांचे संपूर्ण घर धुंडाळत 84 लाख 60 हजार रुपये किमतीचे 1 किलो 410 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 15 लाख 50 हजाराची रोकड, असा एक कोटी 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. डॉ. म्हेत्रे यांच्या घरातून निघून जाताना, कोणताही पुरावा राहणार नाही, याची काळजी घेत तोतया अधिकार्यांनी अगदी घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही काढून नेला. परंतु काही पुरावे स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या हाती लागले आहेत. याआधारे तपास केला जात आहे. तसेच यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या, त्याचीही माहिती सांगली पोलिसांकडून घेतली जात आहे. त्या घटनांमधील संशयित सध्या कोठे आहेत, याचाही तपास केला जात आहे.
संशयितांनी कोणताही सुगावा मागे ठेवला नसला तरी, काही मुद्द्यांच्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवला आहे. त्यामुळे तोतया अधिकारी पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले. लवकरच याचा छडा लागेल, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. दरम्यान, या घटनेच्या तपासाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे.