Bogus doctors 
सांगली

Bogus doctors: पदवी नसताना केलेले आयुर्वेदिक उपचारही बोगस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल : जिल्हा व मनपा प्रशासनाला तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा
गणेश मानस

सांगली : सांगली जिल्ह्यात बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन महापालिका क्षेत्र व जिल्ह्यात तातडीने बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत दिले आहेत. सर्वेक्षण पूर्ण करून १५ दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार १७ जूनरोजी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेशाद्वारे सुचना करण्यात आल्या आहेत.

कोणतेही शिक्षण, पदवी नसतानाही आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार करणाऱ्यांनाही बोगस डॉक्टर म्हणून संबोधले जाणार असून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

काही दिवसापूर्वी पॅथॉलॉजी लॅबमधून एका रुग्णाला एचआयव्हीचा पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आला होता. परंतु दुसऱ्यांदा तपासणी केल्यानंतर तो रिपोर्ट निगेटिव्ह आला. यासंदर्भातील तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत डॉक्टरऐवजी तंत्रज्ञाने रिपोर्ट दिल्याचे आढळून आले. यामुळे तंत्रज्ञ आणि संबंधित डॉक्टरवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात कृष्णा साठे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यात व महापालिका क्षेत्रात बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्यांना अटकाव होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता पवार यांना तातडीने बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सर्व लॅबॉरेटरीज्‌चे प्रभावी सर्वेक्षण करून माहिती संकलित करावी, ज्या पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीजच्या रिपोर्टवर पॅथॉलॉजीस्टच्या स्वहस्ताक्षरातील स्वाक्षरी नाही, अशा पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीजवर कायदेशीर कारवाई करावी, सर्व डेंटल लॅब यांचेही सर्वेक्षण करून माहिती संकलित करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT