सांगली : तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आणली आहे. मागील वर्षी ३० लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे करार केले आहेत. त्यातील ७५ टक्के गुंतवणूक कार्यान्वित झाली आहे. त्यातून रोजगारनिर्मिती सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांत औद्योगिक वसाहती तयार करून त्याठिकाणी उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम देणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. शिक्षकांचे अनेक प्रश्न महायुती सरकारनेच सोडवले असून उर्वरित प्रश्नही महायुती सरकारच मार्गी लावेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव, कौस्तुभ गावडे, माजी मंत्री अण्णा डांगे, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. प्रशांत ठाकूर, आ. अरुण लाड, आ. सत्यजित देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत, आ. इद्रिस नायकवडी, भाजपचे प्रदेश सचिव शरद लाड, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सातत्याने राज्याच्या विकासाचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांत केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार तसेच राज्यातील महायुतीच्या सरकारने मोठ्या प्रमाणात विकासाचा प्रयत्न केला. पायाभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रात मोठे काम केले. रस्ते, पूल तसेच मिसिंग लिंकसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे, विकासाची कामे केली. पायाभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.
ते म्हणाले, महाराष्ट्राच्या अंदाजपत्रकात शिक्षणावर ९० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देशातील सर्वाधिक तरतूद करणारे महाराष्ट्र राज्य आहे. 'केजी टू पीजी' शिक्षणावर ही तरतूद केलेली आहे. शिक्षणावरील योग्य गुंतवणुकीतून मानव संसाधननिर्मिती होते. त्यामुळे यावरील गुंतवणुकीचा परतावा मोठा असतो. कौशल्य शिक्षण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुलांना ५० टक्के फी सवलत, स्पर्धा परीक्षा तयारी केंद्रे आदी सर्व योजना, उपक्रम महायुतीच्या काळात सुरू झाले आहेत. तरुण पदवीधरांचा विचार करून राज्याला पुढे नेण्याचे काम सुरू आहे.