मिरज : मालगाव (ता. मिरज) येथे अवघ्या १ लाख ९५ हजार रुपयांच्या रकमेसाठी तब्बल ६ लाख २९ हजार रुपयांचे अवाजवी व्याज वसूल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदा जगन भंडारे (रा. मालगाव, ता. मिरज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छाया विठ्ठल पांढरे (रा. मालगाव) आणि समीर अकबर मुजावर (रा. गुंडेवाडी) या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात बेकायदेशीर सावकारी व छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदा भंडारे यांनी घरगुती गरजेपोटी छाया पांढरे आणि समीर मुजावर यांच्याकडून एकूण १ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम व्याजाने घेतली होती. या रकमेच्या मोबदल्यात संशयितांनी वेळोवेळी तगादा लावून चंदा भंडारे यांच्याकडून तब्बल ६ लाख २९ हजार रुपये इतकी अवाढव्य रक्कम व्याजाच्या स्वरूपात वसूल केली.
एवढी मोठी रक्कम वसूल करूनही संशयितांची हाव मिटली नाही. त्यांनी मूळ मुद्दल रक्कम अजून मिळायचीच आहे, असे सांगत चंदा भंडारे यांच्याकडे पुन्हा मुदलाची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता. या त्रासाला कंटाळून अखेर चंदा भंडारे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित छाया पांढरे व समीर मुजावर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस या बेकायदेशीर सावकारी प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.