तासगाव : वृद्धाच्या खून प्रकरणातील संशयितासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी व पोलिस पथक.  Pudhari File Photo
सांगली

कारसाठी केला माजी सैनिकाचा खून

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : बलगवडे (ता. तासगाव) येथील माजी सैनिक गणपतराव धोंडिराम शिंदे (वय 65) यांचा खून, कार विकून त्याचे पैसे हडप करण्याच्या उद्देशाने केल्याची कबुली संशयिताने दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली. याप्रकरणी संशयित वैष्णव विठ्ठल पाटील-शिंदे (वय 19, रा. बलगवडे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने देवगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथे पकडले. तासगाव पोलिसांनी संशयिताला अटक केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी : गणपतराव शिंदे हे तासगाव-भिवघाट रस्त्यावरील नवी डोरली फाट्यावरील असणार्‍या त्यांच्या शेतातील घरात एकटेच राहत होते. गणपतराव यांची कार विकून पैसे हडप करण्याच्या हेतूने संशयित वैष्णव याने लोखंडी रॉड गणपतराव यांच्या डोक्यात व कपाळावर मारून त्यांचा खून केला होता. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर संशयित वैष्णव हा गणपतराव यांची कार घेऊन पसार झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश शिंदे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गणपतराव शिंदे यांचा खून संशयित वैष्णवनेच केल्याचे तपासात समोर आले. संशयित कुठे आहे याची माहिती गुन्हे अन्वेषणचे सागर टिंगरे, दर्‍याप्पा बंडगर, प्रकाश पाटील, अमरसिंह सूर्यवंशी व विठ्ठल सानप यांना मिळाली. त्यांच्या पथकाने पाठलाग करून देवगाव येथे वैभवला ताब्यात घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT