सांगली : सांगलीतील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो, म्हणून दिनेश पुजारी याने सहाजणांची 19.84 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. पुजारी याने परतफेडीसाठी दोनदा दिलेले धनादेश वठले नाहीत. याबाबतची तक्रार विवेक माने, मयुरेश अभ्यंकर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिलेली आहे.
2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यादरम्यान दिनेश पुजारी याचे कॉलेजशी जवळचे संबंध आहेत, असे कोळेकर व वडर नामक दोन विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांनी दिनेश पुजारीची ओळख करून दिली. कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करून देतो असे पुजारीने सांगितले. त्यासाठी पैशाची मागणी केली. माने यांच्याकडून वेळोवेळी 4 लाख रुपये, अभ्यंकर यांच्याकडून 5 लाख रुपये, कुंभार यांच्याकडून 2.84 लाख रुपये, मुगरदंड यांच्याकडून 4 लाख रुपये, पाटील यांच्याकडून 2 लाख रुपये व काळे यांच्याकडून 2.50 लाख रुपये घेतले.
दरम्यान, प्रवेशाबद्दल विचारणा केल्यावर प्रवेश निश्चित झाल्याचे पुजारी सांगायचा, मात्र प्रवेश मिळाल्याचे पत्र मिळाले नाही. त्यामुळे शंका आल्यावर कॉलेजमध्ये जाऊन खात्री केल्यावर पुजारी याने फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून विचारणा केल्यावर पुजारीने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पुजारी याला सहाजणांनी वारंवार विचारणा केल्यावर त्याने स्वेच्छेने लिहून देत रक्कम परतफेडीचे धनादेश दिले. मात्र ते न वठता परत आले. त्यामुळे आम्ही विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता तेथे पुजारी उपस्थित झाला. त्याने सामोपचाराने मिटवू, असे सांगितले होते, अशी माहिती अभ्यंकर यांनी दिली.
दरम्यान, पुजारी याने सर्वांना एकत्रितरित्या दि. 19 डिसेंबर रोजी करारपत्र लिहून दिले. रक्कम परत देऊ, असे सांगितले. पुन्हा नव्याने धनादेश दिले. मात्र हे धनादेशही न वठता परत आले. पुजारी याने खोट्या भूलथापा देऊन फसवणूक केली आहे. त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. आमची रक्कम त्याच्याकडून वसूल होणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य ती कारवाई करावी, असा तक्रार अर्ज माने यांनी दि. 23 एप्रिल 2025 रोजी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभ्यंकर यांनी केली आहे.