सांगली : येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या भाजी विक्रेत्यांसह अन्य अतिक्रमणे महापालिकेच्या पथकाने गुरुवारी हटवली आहेत. 12 कट्टे, 3 हातगाडे तोडले. उपायुक्त वैभव साबळे, अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्याशी काही विक्रेत्यांनी वादावादी करत कारवाईस विरोध केला. मात्र साबळे यांनी विरोध हटवून अतिक्रमण काढले.
भाजी मंडईत विक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण झाले होते. वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. भाजी विक्रेत्यांना महापालिकेने रस्त्याच्या कडेला जागा दिलेली आहे. मात्र तरीही अनेक विक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करत होते. अनेक विनापरवाना, बेकायदेशीर हातगाडेही होते. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण काढले. दुकानांसमोर रस्त्यावर अतिक्रमण करून बांधलेले 12 कट्टे जेसीबीने तोडले. 3 हातगाड्याही तोडण्यात आल्या. व्रिकेत्यांनी कारवाईस विरोध केला. उपायुक्त साबळे, अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख घोरपडे यांच्याशी विक्रेत्यांनी जोरदार वाद घातला. मात्र विरोध झुगारून साबळे यांनी कारवाई पूर्ण केली.
शहरात टोलेजंग इमारती बांधताना बेसमेंटला पाकिर्र्ंग सुविधा दाखवली आहे. मात्र अनेक ठिकाणी बेसमेंटमध्ये दुकाने थाटली आहेत. वाहने रस्त्यावर पार्क केली जातात, त्याबाबत महापालिका काय पवित्रा घेणार, की केवळ भाजी विक्रेते, हातगाड्यांवरच जेसीबी चालवणार, असा प्रश्न जनसेवा फळे भाजीपाला व खाद्यपेय विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी केला आहे. महापालिकेने फेरीवाला नोंदणी सुरू करावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, शहरातील सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करणार आहे. नागरिक व वाहतुकीला रस्ते खुले करण्यात येतील. मात्र या सोबतच कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी महापालिका घेईल. अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायासाठी जागा देण्यात येणार आहे. यासाठी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणार आहे. भाजी विक्रते, हातगाडीवाले व अन्य विक्रेत्यांनाही खुल्या जागेवर व्यवसायास जागा देण्याचे धोरण राबविण्यात येणार आहे.
भाजी मंडईसमोरील अतिक्रमणात अडकलेला मोठा चौकही या कारवाईमुळे मोकळा झाला आहे. उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत या मोहिमेत सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण विभागाचे दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, विक्रम घाडगे आणि कर्मचारी सहभागी झाले होते.