सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाला संचालक मंडळाने पुन्हा एकदा ठाम विरोध दर्शवला आहे. संचालक मंडळ व प्रशासनाला आपले म्हणणे मांडण्यासाठी देण्यात आलेल्या अंतिम मुदतीपर्यंत १५ पैकी ११ संचालकांनी त्रिभाजनाच्या विरोधात स्वतंत्र अभिप्राय जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्याकडे सादर केले आहेत. दरम्यान, जत आणि कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे चालू शकणार नाहीत, असे मत नोंदवत बाजार समिती प्रशासनानेही या त्रिभाजनाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
त्रिभाजनाला विरोध करणाऱ्या ११ संचालकांनी स्वतंत्रपणे आपले म्हणणे मांडताना, बाजार समितीचे विभाजन झाल्यास शेतकऱ्यांवर आणि सहकार क्षेत्रावर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले आहे. बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी प्रशासनाच्या वतीने सादर केलेल्या अभिप्रायात नमूद केले आहे की, जत आणि कवठेमहांकाळ येथील प्रस्तावित स्वतंत्र बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत आणि पुढील पाच वर्षेही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या स्वतंत्र बाजार समित्यांच्या निर्णयाला संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने भागधारक व मतदारांचे म्हणणे जाणून घेण्याचे आदेश दिल्यानंतर झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्रिभाजन करू नये, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. मात्र, पणन विभागाने त्रिभाजनाबाबत स्पष्ट अहवाल मागवल्याने जिल्हा उपनिबंधकांनी पुन्हा अभिप्राय मागवले आहेत. ११ संचालकांचा विरोध आणि प्रशासनाच्या प्रतिकूल अभिप्रायानंतर आता जिल्हा सहकार उपनिबंधक काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. यावर शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बाजार समितीतील व्यापारी प्रतिनिधी काडाप्पा वारद आणि प्रशांत पाटील-मजलेकर यांनी अभिप्रायासाठी कोणतीही मुदतवाढ मागितलेली नाही, तसेच मुदत संपली तरीही आपला अभिप्राय सादर केलेला नाही. त्यामुळे त्रिभाजनाच्या या संवेदनशील मुद्द्यावर दोन्ही व्यापारी संचालकांची भूमिका नेमकी काय आहे, हे अद्याप अस्पष्टच आहे.