सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दिवाळी संपल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागेल. त्यामुळे निवडणूक मोडमध्ये या, निवडणुका जिंकण्यासाठी गाफील न राहता कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, सांगली जिल्ह्यात सर्वत्र भाजपला चांगले वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र भाजपचा विजय होईल, अशी खात्रीही जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.
भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, दीपक शिंदे, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, नीता केळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक नेत्यांशी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा करत तेथील राजकीय स्थितीचा आढावा घेतला. शेखर इनामदार यांनी महापालिकेबाबत आढावा मांडला. ते म्हणाले, 2018 च्या निवडणुकीत भाजपने 78 पैकी स्वबळावर 41 जागा जिंकत महापालिकेवर सत्ता मिळवली होती. दोन अपक्षांनीही पाठिंबा दिला होता. त्यामुळे मोठे बहुमत होते. भाजपने मिळालेल्या सत्ताकाळात चांगली कामे केली. शासनाने दिलेले 100 कोटींचे अनुदान, कुपवाड ड्रेनेज योजना, घनकचरा प्रकल्प यासारखी अनेक विकास कामे मार्गी लागली. येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.
जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे. महापालिकेवर सत्ता मिळवू, अशी ग्वाही शेखर इनामदार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, सांगलीतील कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. यासाठी महापालिकेने शेरीनाल्याचा 93 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. तो तातडीने मंजूर करावा. शहराभोवतीचे रिंगरोड मंजूर करावेत.
आ. सुरेश खाडे म्हणाले, वसंतदादा कारखान्याची धडक पाणी योजना बंद झाल्याने मिरज तालुक्यातील 11 गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समाविष्ट करावे. यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे आला असून तो मंजूर करावा.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करावी. जुन्या जीर्ण पाईपलाईन बदलाव्यात, विस्तारित भागात गरजेनुसार नवीन पाईपलाईनसाठी निधी द्यावा. कवलापूरला विमानतळ करावे.
पृथ्वीराज पवार म्हणाले, सांगलीत स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी स्थापन करावी. दीपक शिंदे म्हणाले, महापालिका क्षेत्रात मेट्रो सेवा सुरू करावी.
प्रकाश ढंग म्हणाले, महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत कुपवाड शहरासाठी स्वतंत्र ड्रेनेज योजना करण्याचा शब्द भाजपने दिला होता, तो पूर्ण केला आहे. 270 कोटी मंजूर केले. या योजनेचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र ड्रेनेज लाईनच्या चरीसाठी शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यासाठी शासनाने विशेष निधी मंजूर करावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार आहे. तातडीने काही प्रस्ताव मार्गी लावले जातील.