सांगली ः येथील आंबेडकर रस्त्यावर रविवारी पहाटेच्या सुमारास बस व दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार झाला. अपघातानंतर बस रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. त्यात बसमधील वाहकासह दोघेजण किरकोळ जखमी झाले. मेहबूब फक्रु द्दीन शेख (वय 65, रा. शंभरफुटी रोड) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. गेल्या महिन्याभरात आंबेडकर रस्त्यावर झालेला हा तिसरा अपघात आहे. या अपघातात रूपेश सलाम (38, रा. सेवासदनजवळ, मिरज) व शारदा महालिंग मदने (40, रा. कोल्हापूर) हे दोघेजण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेख हे सुतारकाम करीत होते. पहाटे साडेपाच वाजता ते बसस्थानक परिसरात जाऊन येतो, असे सांगून दुचाकीवरून (एमएच 10, एएल 1076) घराबाहेर पडले. ते बसस्थानकाकडून सिव्हिल चौकाकडे निघाले होते. यावेळी मिरजेहून सांगलीच्या दिशेने बस (एमएच 14, बीटी 4857) येत होती. मराठा समाज भवनजवळ या बसने शेख यांच्या दुचाकीला धडक दिली. यात शेख गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बस रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. बसच्या धडकेत झाडही उन्मळून पडले. यावेळी बसमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर शेख यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.