सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याच्या पाठीमागील बैलगाडी तळावर किरकोळ वादातून एका वृद्धाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. राजेंद्र बाबुराव घायतिडक (वय 69, सध्या रा. पलूस, मूळ रा. प्रकाशनगर, सांगली) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घायतिडक मूळचे अहिल्यानगरनजीकच्या प्रकाशनगरमधील रहिवासी होते. कौटुंबिक कारणांमुळे ते काही काळापासून पलूस येथे मुलीकडे राहत होते. सध्या ते संजयनगरमधील दुसऱ्या मुलीकडे आले होते. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते कारखान्याच्या पाठीमागील गाडी तळावरून जात असताना, तिथे तीन अल्पवयीन मुले आली. त्यापैकी एकजण नशेत होता. या मुलांशी घायतिडक यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. वादावादीदरम्यान घायतिडक यांनी मुलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता, रागाच्या भरात तिघांनी त्यांना ढकलून दिले आणि जमिनीवरील दगड त्यांच्या डोक्यात घातला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मध्यरात्री घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्याने त्यांनी संजयनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी तपासाच्या सूचना दिल्या. संजयनगरचे पोलिस निरीक्षक सतीश कदम यांनी पंचनामा केला.