Fraud (Pudhari Photo)
सांगली

Fraud Case: भोंदूकडून वृद्धास सव्वातीन लाखांचा गंडा

कडेपूरमध्ये सोने दुप्पट करून देतो म्हणत दागिने लंपास

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव : कडेपूर (ता. कडेगाव) येथे सोन्याचे दागिने वाढवून देतो, अशी बतावणी करून एका 60 वर्षीय वृद्धाला लुबाडण्यात आले. एका भोंदू बुवा आणि त्याच्या साथीदाराने तानाजी विष्णू मोहिते (वय 60, रा. तोंडोली, ता. कडेगाव) यांच्याकडून 67 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना 8 फेब्रुवारीरोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कडेपूर-पुसेसावली रस्त्यावर घडली. कडेगाव पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रविवार, दि. 8 रोजी तानाजी मोहिते हे कडेपूर-पुसेसावळी रस्त्याच्या कडेला थांबले होते. यावेळी एका मोटारीतून 70 वर्षांचा भोंदू बुवा आणि एक 35 वर्षांचा तरुण खाली उतरले. अंगावर कपडे नसलेल्या, डोक्याला भस्म लावलेल्या बुवाने मोहिते यांच्या तोंडावरून हात फिरवून त्यांची दिशाभूल केली. अंगावरील दागिने दुप्पट करून देतो, दागिने वाढवून देतो, असे आमिष त्याने मोहिते यांना दाखवले.

भोंदू बुवाच्या आमिषाला बळी पडून मोहिते यांनी स्वतःजवळील दागिने त्याच्याकडे दिले. संशयितांनी त्यांच्या हातातील 40 ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट आणि गळ्यातील 27 ग्रॅमची सोन्याची साखळी, असा एकूण 3 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शिताफीने लंपास केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तानाजी मोहिते यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, परिसरातील सीसीटीव्ही आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT