Crime News File Photo
सांगली

Sangli Crime: मुलगा, सून, नातवासह चौघांकडून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला

जत तालुक्यातील बनाळी येथील घटना : घरगुती वाद

पुढारी वृत्तसेवा

जत शहर : बनाळी (ता. जत) येथे घरगुती कारणावरून मुलगा, सून व नातवासह चौघांनी वृद्ध दाम्पत्यास घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रामचंद्र गणपती यादव (वय 70, व्यवसाय मजुरी, रा. बनाळी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नातू श्रीकांत अरुण यादव, नातेवाईक सुधाकर आबा जाधव, मुलगा अरुण रामचंद्र यादव व सून सविता अरुण यादव (सर्व रा. बनाळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास सर्व संशयित फिर्यादी रामचंद्र यादव यांच्या घरासमोर आले. त्यांनी दरवाजावर दगड मारत दरवाजा उघडण्यास सांगून शिवीगाळ सुरू केली. दरवाजा उघडल्यानंतर सर्वजण घरात घुसले. रामचंद्र यादव तसेच त्यांची पत्नी शालन यांना हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी नातू श्रीकांत अरुण यादव याने काठीने रामचंद्र यांच्या उजव्या पाठीवर हल्ला करून त्यांना जखमी केले. सुधाकर जाधव याने शालन यादव यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर, दंडावर तसेच उजव्या खुब्यावर काठीने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मारहाणीनंतर शिवीगाळ करून पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. जाताना पुन्हा रामचंद्र यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले. मारहाणीत रामचंद्र व त्यांची पत्नी शालन जखमी झाले आहेत. याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT