रजाअली पीरजादे
कडेगाव शहर : हजारो विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. परंतु या युवकांसाठी पुरेशा रोजगार संधी निर्माण झाल्या नाहीत. शिक्षण असूनही काम नसणे ही अत्यंत दुःखद व समाजाला हादरवून टाकणारी बाब आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवक नैराश्याच्या विळख्यात अडकत असल्याचे स्पष्ट चित्र कडेगाव तालुक्यासह ग्रामीण भागात दिसून येत आहे.
आजच्या घडीला राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा सामाजिक प्रश्न कोणता, असे विचारले तर नक्कीच सुशिक्षित बेरोजगारी हेच उत्तर ठरेल. प्रत्येक गावात शाळा, तालुक्यांत विद्यालये, महाविद्यालये आणि जिल्ह्यांत व्यावसायिक शिक्षण संस्था उभ्या आहेत. शासकीय नोकर्या या युवकांच्या दृष्टीने सर्वाधिक आकर्षक असतात. मात्र गेल्या काही वर्षांत या नोकर्यांची संख्या प्रचंड घटली आहे. विविध विभागांतील भरती प्रक्रिया वर्षानुवर्षे लांबणीवर टाकल्या जातात.
परीक्षा होतात, निकाल लागतो, पण नेमणुकीपर्यंत पोहोचायला दोन-दोन वर्षांचा कालावधी जातो. परिणामी हजारो तरुण वयाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच अडकून पडतात. दुसरीकडे खासगी क्षेत्रातील संधीही मर्यादित व असमाधानकारक आहेत. अल्प पगार, असुरक्षित सेवा, कामाचा ताण व दीर्घ कामाचे तास यामुळे अनेक युवक नाराज आहेत. त्यातच ग्रामीण व लहान शहरांतील तरुणांना मोठ्या शहरांत जावे लागते. घरचा खर्च, भाडे, प्रवास यात मिळालेला पगार संपून जातो. परिणामी सुशिक्षित बेरोजगारी केवळ रोजगाराचा प्रश्न न राहाता, तो सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न बनत चालला आहे. या परिस्थितीचा सर्वच क्षेत्रात स्पष्ट दिसतो. काही युवक खचून जातात, नैराश्याच्या गर्तेत सापडतात. तर काहीजण परदेशी संधींच्या मागे धाव घेतात, ज्यामुळे देशातील मेंदू व कौशल्य बाहेर जात आहे. ग्रामीण भागातील युवक नोकरीच्या प्रतीक्षेत शेतीवर अवलंबून राहतात व घरगुती आर्थिक ओझे वाढवतात.
सुशिक्षित युवक हा समाजाचा कणा आहे. त्यांची क्षमता व ऊर्जाच देशाच्या प्रगतीचा पाया आहे. पण जर तीच ऊर्जा बेरोजगारीच्या दलदलीत अडकली तर समाजाचे भविष्य धोक्यात येईल. शासन, समाज आणि स्वतः युवकांनी एकत्र येऊन या समस्येवर उपाययोजना राबविणे ही काळाची गरज आहे. सुशिक्षित बेरोजगारी संपविणे म्हणजे केवळ युवकांना रोजगार देणे नाही, तर संपूर्ण समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाया घालणे होय.
सर्वप्रथम शासकीय नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक, वेळेत व सुलभ व्हायला हवी. प्रत्येक वर्षी ठराविक प्रमाणात भरती करणे बंधनकारक केले पाहिजे. दुसरे म्हणजे कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणे आवश्यक आहे. केवळ पदवी घेऊन उपयोग होत नाही. डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता, कृषिपूरक व्यवसाय, सेवा क्षेत्र यामध्ये प्रचंड संधी आहेत. युवकांना त्यासाठी प्रशिक्षण व भांडवली मदत मिळाली पाहिजे.
स्टार्टअप्स हा आजच्या पिढीसमोरील एक मोठा पर्याय आहे. योग्य मार्गदर्शन, कर्जसाहाय्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास लाखो युवक रोजगार घेणारे न राहता रोजगार निर्माण करणारे बनू शकतात. तसेच लघुउद्योग, सहकारी संस्था, महिला बचत गट, शेती प्रक्रिया उद्योग यांना प्रोत्साहन दिल्यास ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते.