मिरज : नशेसाठी वापरण्यात येणार्या मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा पुरवठा उत्तर प्रदेशाच्या मुरादाबादमधून होत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी उत्तर प्रदेशात सापळा रचून मुख्य पुरवठादाराच्या मुसक्या आवळल्या. इंतजार अली जहीरुद्दीन (वय 25, रा. खलीलपूर, ता. कांठ, जि. मुरादाबाद) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबत माहिती अशी, महात्मा गांधी चौक पोलिसांनी 20 जानेवारी रोजी मिरजेतील उद्यानाजवळ नशेसाठी इंजेक्शन व गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या ओंकार मुळे व रोहित कागवाडे या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून अशपाक बशीर पटवेगार याचे नाव निष्पन्न झाले. पटवेगार हा केमिस्ट असून त्याच्या घरावर छापा टाकून नशेसाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन्स व गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी तिघांकडून 14 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. तीनही संशयितांच्या चौकशीत सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातील एजंटांची माहिती मिळाली होती. पोलिसांनी आठ एजंटांना जेरबंद केले.
मुख्य संशयित अशपाक पटवेगार याच्या चौकशीत त्याने उत्तर प्रदेशातील मुरदाबाद येथील इंतजार अली जहीरूद्दीन याच्याकडून काळ्या बाजारातून अवैध मार्गाने मेफेन्टरमाइन इंजेक्शन मागवून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील मुरादाबादला रवाना झाले. मुख्य सूत्रधार इंतजार अली जहीरुद्दीन याला ताब्यात घेऊन मिरजेत आणले. मिरज न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे करीत आहेत.
याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली. यात सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातील आठ एजंटाचाही समावेश आहे. रोहित कागवाडे (रा. सांगली), ओंकार मुळे (रा. सांगली), अशपाक पटवेगार (रा. सांगली), वैभव ऊर्फ प्रशांत पाटोळे (रा. कडेगाव), ऋतुराज भोसले (सांगलीवाडी), अमोल मगर, साईनाथ वाघमारे, अविनाश काळे, देवीदास घोडके (सर्व रा. माळशिरस), आकाश भोसले (रा. माण), हनुमंत शिंदे (रा. माळशिरस), ललित पाटील (रा. शाहुवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.