एमडी ड्रग्ज 
सांगली

आर्थर रोड जेलमध्ये ठरला ड्रग कारखान्याचा प्लॅन

तपासात झाले उघड; दया नायक यांनी सुलेमानला ठोकल्या होत्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

सांगली : कार्वे (ता. खानापूर) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एमडी ड्रग्ज बनविण्याचा प्लॅन मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कार्वे-विटामधील एमडी ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून अटक केलेल्या रहुदीप बोरीचा (रा. उत्तीयादरा, जि. सुरत, गुजरात), सुलेमान जोहर शेख (रा. बांद्रा पश्चिम, मुंबई) व बलराज अमर कातारी (रा. साळशिंगे रस्ता, विटा) या तिघांची मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती. तेथेच त्यांनी एमडी ड्रग्ज बनवण्याचे ठरवले होते. दोन-तीन वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी एका मोटारीतून एमडी ड्रग्जचा साठा घेऊन चाललेल्या बलराज कातारी याला पकडले. त्यानंतर कारखान्यातील रहुदीप बोरिचा, सुलेमान शेख या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली होती. 29 कोटी 74 लाख रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. विटा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे तपास सोपवला आहे.

संशयित रहुदीप बोरिचा, सुलेमान शेख आणि बलराज कातारी या तिघांची मुंबईतील आर्थररोड कारागृहात असताना ओळख झाली होती. तेव्हाच त्यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर एमडी ड्रग्जची निर्मिती करण्याचे ठरवले होते. 2022 मध्ये बलराज कातारी कारागृहातून बाहेर आला. तो ड्रग्जच्या निर्मितीसाठी जागा शोधत होता. परंतु त्याच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे कोणी जागा देत नव्हते. अखेर एका मध्यस्थामार्फत त्याने कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये माऊली इंडस्ट्रीज या बंद पडलेल्या कारखान्याचे शेड भाड्याने घेतले. रहुदीप बोरिचा, सुलेमान शेख यांना बोलावून घेतले. त्यानंतर परफ्युमचे उत्पादन करत असल्याचे त्याने दाखवले. प्रत्यक्षात एमडी ड्रग्जचे उत्पादन सुरू केले. त्यानंतर अवघ्या महिनाभरात याची कुणकुण सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला लागल्यानंतर कारवाई केली.

तिघांवरही गुन्हे दाखल

रहुदीप याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. बलराज याने विट्यातील साथीदारांच्या मदतीने मुंबईत जबरी चोरीचे गुन्हे केले होते, तर सुलेमान याच्यावर एमडी ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल होता. यामध्ये पाच वर्षांपासून तो कारागृहातच होता. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेले तिघेही गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

दोनवेळा फसला, तिसर्‍यांदा जमलं

रहुदीप हा रसायनशास्त्राचा पदवीधर. त्याला एमडी ड्रग्जविषयी माहिती होती. काही चित्रफितींच्या माध्यमातून त्याने दोघांच्या मदतीने ड्रग्जचे उत्पादन सुरू केले. दोनवेळा त्यांचा हा प्रयत्न फसला; परंतु तिसर्‍यांदा त्यांना एमडी ड्रग्ज बनवण्यात यश आले. तयार केलेले एमडी ड्रग्ज मुंबईस विक्रीस नेताना टोळी पकडली गेली. त्यामुळे यामध्ये मोठी साखळी असल्याचे समोर आले. त्यामुळे कार्वे एमडी ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील कोणा-कोणाचा समावेश आहे का, याचा शोध आता सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT