कडेगाव शहर : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर प्रभावी आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत सरकारला धारेवर धरले. त्यांच्या आक्रमक आणि मुद्देसूद भूमिकेमुळे अधिवेशनात सामान्यांच्या प्रश्नांना आवाज मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत डॉ. कदम यांनी बेरोजगारीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. एप्रिल ते नोव्हेंबर 2025 दरम्यान 34.54 लाख बेरोजगारांची नोंद झाल्याची आकडेवारी त्यांनी सभागृहात मांडली. लाखो कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणा होत असताना प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती कुठे झाली?, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला. तसेच 200 हून अधिक कंपन्या राज्याबाहेर गेल्याचा मुद्दा मांडत त्यांनी उद्योग धोरणातील त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटी, वाढता उत्पादन खर्च, वीज समस्या आणि सिंचनाकडील दुर्लक्ष यावर त्यांनी ठोस भूमिका मांडली. सांगली जिल्ह्यासाठी द्राक्ष संशोधन केंद्राची मागणी करत त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी आपला पाठपुरावा कायम असल्याचे सिद्ध केले. ग्रामीण भागातील पाणंद रस्त्यांच्या कामातील प्रशासकीय दिरंगाई उघड करत त्यांनी वेळबद्ध अंमलबजावणीची मागणी केली. शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद शाळांच्या अडचणी मांडताना ‘मॉडेल स्कूल’ संकल्पना राज्यभर राबवण्याचा दूरदृष्टीचा प्रस्तावही त्यांनी मांडला. याशिवाय, आखाती देशांतील युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे नूतनीकरण यांसारख्या संवेदनशील विषयांवरही त्यांनी आग्रही मागणी केली. एकूणच, या अधिवेशनात डॉ. कदम यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.