ईश्वरपूर : पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौश्ल्य विकास केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येतील, असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांनी केले.
डॉ. स्मिताताई जाधव यांनी सोमवारी वाळवा तालुका शिक्षण संस्थेला भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव अॅड. बी. एस. पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी अॅड. पाटील, संस्थेचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील व माजी नगराध्यक्ष प्रा. अरुणादेवी पाटील यांच्याशी चर्चा केली. या वेळी उभय कुटुंबांतील जुन्या कौटुंबिक व सामाजिक ऋणानुबंधांच्या आठवणींना उजाळा मिळाला. या प्रसंगी शंतनू पाटील, हर्षाली पाटील, शितल पाटील आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी, डॉ. स्मिताताई जाधव यांनी वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा, शैक्षणिक परिसर आणि इमारतींची पाहणी करून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेबद्दल कौतुक केले. या प्रसंगी अॅड. धैर्यशील पाटील, प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव, प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर, प्राचार्य राम शिंदे, प्राचार्य एस. एल. पाटील, मुख्याध्यापक एस. डी. यादव, उपप्राचार्य प्रा. अमोल पाटील आदी उपस्थित होते.