कुंडल : सध्याचे राजकारण जाती व्यवस्थेवर सुरू आहे. जातिभेद नष्ट करण्यासाठी नवनवीन पर्याय शोधले पाहिजेत. हे काम तरुणांनी हाती घेतल्याशिवाय देशाला तरणोपाय नाही. तसेच सर्वत्र पुन्हा प्रतिसरकारची निर्मिती व्हावी, असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.
कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जयंतीनिमित्त प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ‘क्रांतिअग्रणी पुरस्कार’ प्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख 1 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रा. डॉ. नेमाडे बोलत होते. आमदार अरुण लाड, प्रतिभा नेमाडे, अॅड. प्रकाश लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड, क्रांतिवीरांगणा विजया लाड यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
डॉ. नेमाडे म्हणाले, क्रांतिअग्रणी पुरस्काराने मी प्रभावित झालो असून, मीही कोणत्यातरी क्षेत्रात क्रांती केल्यासारखे वाटत आहे. या परिसरात जी. डी. बापू यांच्या खूप आठवणी आहेत. त्यांचा वैचारिक वारसा तरुण पिढीने चालवला पाहिजे. ते म्हणाले, सर्वच क्षेत्रांत जाती-पातीचे प्रश्न वाढत आहेत. आपला देश जातीव्यवस्थेवर तयार झाला आहे. जातीव्यवस्था खोलवर रुजली असून, तिचे निर्मूलन करणे शक्य होणार नाही. आपल्या देशातील घटस्फोट आणि ‘डेटिंग’ची पद्धत अत्यंत चुकीची आहे. इंग्रजी शिक्षण व्यवस्थेमुळे तरुण पिढीची वाताहत होत आहे. सध्याचे राजकीय वातावरण हास्यास्पद असून, ते टाळायचे असेल तर इथल्या लोकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. दूरचित्रवाणीमुळे माणसांची डोकी चालायची बंद झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मराठवाड्यातील परिस्थिती खूप वाईट आहे. तिथे रोज किमान एका शेतकर्याची आत्महत्या होते. तर मुंबईमधील मोठी लोकवस्ती फूटपाथवर जीवन जगत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी माझ्यासोबत साहित्याच्या माध्यमातून जवळीकता साधली, हे माझे भाग्य आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांची उभारलेली स्मारके ही देशाच्या पर्यटन यादीत समावेश करण्याएवढी सुसज्ज आहेत. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू यांच्या नावाने दिला जाणारा क्रांतिअग्रणी पुरस्कार साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वास दिला जात आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. नेमाडे यांचा विश्वसाहित्याशी संबंध आहे. ते कोणत्याही क्षेत्रात लिलया विचार करायला लावणारे समीक्षक आहेत. कोणत्याही गोष्टीला तर्क असल्याशिवाय निष्कर्ष काढता येत नाहीत. आमदार लाड म्हणाले, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत राहिले. परिसरातील शेती व शेतकरी समृद्ध होण्यासाठी त्यांनी उपसा जलसिंचन योजना सुरू केल्या.
यावेळी व्ही. वाय. पाटील, बाळासाहेब पवार, सर्जेराव पवार, सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार, रणजित लाड, विक्रांत लाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, श्रीकांत लाड, कुंडलिक एडके, भाई संपतराव पवार, क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्री लाड, क्रांती कारखान्याचे सर्व संचालक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रताप लाड यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले. आप्पासाहेब कोरे यांनी आभार मानले.
प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणाले, आपल्याकडे कुठल्याही गोष्टीच्या मुळात जाण्याची वृत्ती नाही. आपण आपली मराठी भाषाही नीट बोलू शकत नाही. या भाषेकडे दुर्लक्ष होत आहे. मुंबईसारख्या शहरात मराठी माध्यमाच्या अनेक शाळा बंद पडल्या आहेत. अनेक पालक लाखो रुपयांचे डोनेशन देऊन आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश घेत आहेत. आपल्या मुलांचा फक्त गणवेश चांगला असून, चालणार नाही. तर त्यांचे विचार चांगले असणे गरजेचे आहे.