शिराळा ः आमदार चोरून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला शेतकर्यांबाबत कोणतीही आस्था नाही. शेतकर्यांच्या ताटात माती कालविण्याचे काम करणार्या सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे प्रतिपादन खासदार, डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. पणुंब्रे तर्फ वारूण (ता. शिराळा) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
डॉ. कोल्हे म्हणाले, राज्यात नेते व मंत्री विकत घेता येतात, हे भाजपने दाखवून दिले आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा. कर्तृत्ववान असणार्या मानसिंगराव नाईक यांच्या हाती शिराळा मतदारसंघाचे नेतृत्व कायम ठेवा. ते जयंत पाटील यांच्या काळजाच्या कप्प्यातील आहेत. त्यामुळे विकासात कमी पडणार नाहीत. भाजपाकडून मोदीजींना खूश करण्यासाठी सर्व्हे केला जात आहे. भाजपाच्या राजवटीत मोटरसायकलला 28 टक्के आणि हेलिकॉप्टरला 5 टक्के जीएसटी आहे. म्हणजे सरकारला शेतकर्यांपेक्षा व्यापारी महत्त्वाचे आहेत. महिन्याला 200 शेतकरी आत्महत्या करत आहेत. जातीयवादी भाजपाला घरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे.
जयंत पाटील म्हणाले, शिवाजीराव देशमुख यांचा भाजपच्या जातीयवादी राजकारणाला कडाडून विरोध होता. यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, वसंतदादा पाटील यांनी बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय घेतले. कारण जातीय विषवल्ली वाढणे हे देशाच्या हिताचे नाही, हे त्यांना माहीत होते. ती विषवल्ली आपल्या मतदारसंघात येत असेल तर आपण विरोध केलाच पाहिजे. ते ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणत आहेत, पण शेतकर्यांवर सोयाबीन कापण्याची वेळ आली. शेतीमालाला दर नाही. शेतकरीविरोधी धोरणे राबविणार्यांना निवडणुकीत धडा शिकवा. मानसिंगराव नाईक यांना आमदार करा. मी त्यांचा योग्य सन्मान करतो.
मानसिंगराव नाईक म्हणाले, आमचे विरोधक कर्तृत्वशून्य आहेत. ते कारखान्याचे अध्यक्ष झाले आणि चार महिन्यांत कारखाना विकून टाकला. अशा माणसाला मतदारसंघात थारा नाही. आम्ही विकासाची भूमिका घेऊन मतदारसंघात कामे केली. मतदारसंघात रस्ते, साठवण तलाव, आरोग्य सुविधा, सामाजिक सभागृह यांचा विस्तार केला. शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना भक्कम केल्या. पणुंब्रे वारूण मतदारसंघात 70 कोटींची विकासकामे केली. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक, बी. के. नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सभापती सम्राटसिंह नाईक, नीलेश साठे, संदीप बागडे, शिवाजी पाटील, धनंजय माने, भागवत जाधव, राजेंद्र नाईक, अनिल पाटील, प्रल्हाद पाटील, आनंदराव पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, सचिन पाटील उपस्थित होते.