Jayant Patil Pudhari
सांगली

Jayant Patil | अजित पवार यांच्या मृत्यूच्या निष्पक्ष चौकशीबाबत शंका : आ. जयंत पाटील

रोहित पवार यांनी मांडलेले मुद्दे रास्त

पुढारी वृत्तसेवा

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या शंका रास्त आहेत. त्यांनी या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. या घटनेची सखोल व पारदर्शीपणे चौकशी झाली पाहिजे, मात्र ती होईल का, याबाबत शंका आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.

ते म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी केलेल्या निरीक्षणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या प्रकरणातील सत्य समोर यावे, ही सर्वांची अपेक्षा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण होत असतील तर शासनाने तातडीने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. ही केवळ राजकीय बाब नाही, तर न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणांनी दबावमुक्त वातावरणात तपास करावा.

ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे; मात्र ती निष्पक्षपणे आणि पारदर्शकतेने होईल का, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. या शंका दूर करण्याची जबाबदारी शासनाची आहे. दरम्यान, ब्लॅक बॉक्स कसा काय जळू शकतो, असा प्रश्नही आ. पाटील यांनी उपस्थित केला. या विमान दुर्घटनेप्रकरणी सर्व संबंधित कागदपत्रे, घटनाक्रम आणि साक्षीदारांची माहिती तपासून वस्तुस्थिती समोर आणावी. सत्य बाहेर येणे, हेच लोकशाहीसाठी हितावह आहे, असे मतही आ. पाटील यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT