सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने सांगलीतील दांपत्याला तब्बल 9 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सुमित राजाराम जाधव यांनी गणेश दुर्गादास जाधव (रा. जालना) याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सुमित जाधव यांचे आई - वडील हे सांगलीतील सूतगिरणी येथे वास्तव्यास आहेत. त्यांना गणेश जाधव याने, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार या दांपत्याकडून गणेश जाधव याने दि. 5 जुलै रोजी 4 लाख रुपये, दि. 6 जुलै रोजी 3 लाख रुपये रोख आणि त्यानंतर बँक खात्यावरून 3 लाख रुपये, असे एकूण दहा लाख रुपये घेतले होते.
परंतु गणेश जाधव याने दिलेल्या मुदतीत सुमित जाधव यांच्या आई - वडिलांना दामदुप्पट रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी गणेश जाधव याच्याकडे दिलेली रक्कम परत देण्याची मागणी केली. परंतु, रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवलेली आहे, असे सांगून त्याने दहा लाख रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. परंतु सुमित जाधव यांच्या आई-वडिलांनी रक्कम परत देण्यास तगादा लावल्यानंतर गणेश जाधव याने एक लाख रुपये परत दिले. परंतु उर्वरित 9 लाख रुपये परत न देता फसवणूक केली असल्याचे सुमित जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.