सांगली : सांगलीतील गारपीर परिसर मंगळवारी मध्यरात्री नंतर रक्तरंजित हल्ल्याने हादरला आहे. दलित महासंघाचे कार्यकर्ते उत्तम मोहिते यांच्यावर शा-या उर्फ शाब्या शाहरुख शेख या इसमाने तलवारी सारख्या धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतापलेल्या उत्तम मोहिते यांच्या पुतण्याने शेखवर प्रत्युत्तरात हल्ला चढवला आणि त्यात शेखचाही जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तम मोहिते आणि शाहरुख शेख यांच्यातील जुन्या वैमनस्यातून ही दुहेरी हत्या घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मात्र, ही सुपारी किलिंग होती का, की इतर कोणते कारण यामागे दडले आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात किमान चार जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सांगली शहर पोलीस दलाची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. गारपीर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गारपीर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. सांगलीत डबल मर्डरमुळे रात्रीची शांतता रक्तरंजित बनली आहे.