ईश्वरपूर : तडीपार आणि मोक्कासारख्या गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आलेले गुंड, गुन्हेगार शहरात राजरोस फिरत आहेत. हेच गुंड तुमच्याकडे मते मागायला येऊ शकतात. मात्र शहरातील सूज्ञ जनता हे शहर गुंडांच्या ताब्यात देणार नाही, याची मला खात्री आहे. या शहराचा गेल्या 9 वर्षांत खुंटलेला विकास पुन्हा गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी कचेरी चौकात आयोजित जाहीर सभेत आ. पाटील बोलत होते. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ॲड. मनीषा रोटे, नंदकुमार कुंभार, राजेंद्र शिंदे, महेश पाटील, एल. एन. शहा, विजय कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील आदी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, परवा पालकमंत्री आपल्या शहरात येऊन गेले. ते म्हणतात, आमच्या लोकांना निवडून द्या, आम्ही या शहरातील भुयारी गटारी, 24 तास पाणी, रस्ते आदी विकास कामे मार्गी लावू. गेल्या 9 वर्षात तुमचीच सत्ता आहे, मग ही विकास कामे का केली नाहीत? या शहराच्या नाव बदलासाठी बाळासाहेब पाटील व उरूण परिसरातील सर्व भावक्या व समाजानी आंदोलन केले आहे. इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले, मात्र शहराच्या नावात उरूणचा समावेश झालेला नाही. यांनी जनतेची दिशाभूल करू नये.
आनंदराव मलगुंडे म्हणाले, गेल्या 35 वर्षांपासून नगरसेवक म्हणून या शहराची प्रामाणिक सेवा केली आहे. आ. जयंत पाटील व आपण सर्वांनी मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखविला आहे, तो रात्रंदिवस काम करून सार्थ करू. महेश पाटील म्हणाले, या शहरात गुंडांच्या टोळ्या सक्रिय होत असतील, तर आमच्या माता-भगिनींचे रक्षण कसे करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. ॲड. धैर्यशील पाटील, रणजित मंत्री, सुभाषराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते. माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी आभार मानले. संचालक शैलेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.