Admission Scam  Pudhari File Photo
सांगली

Medical admission fraud: वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने डॉक्टरला 15 लाखांचा गंडा

नवी मुंबईतील भामट्याविरोधात सांगलीत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : नवी मुंबईतील एम. जी. एम. मेडिकल कॉलेज येथे मुलाला ‌‘एमडीएस‌’साठी प्रवेश देतो, असे सांगून सांगलीतील एका डॉक्टरची 15 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत डॉ. चंद्रकांत पंडित सगरे (वय 54, रा. माळी कॉलनी, वारणाली रस्ता, विश्रामबाग) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी संशयित राकेशकुमार कापरी (रा. सेक्टर 19 डी, हॉटेल मेगू इनजवळ, मार्केटजवळ, वाशी, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित राकेशकुमार कापरी (पूर्ण नाव माहीत नाही) आणि डॉ. सगरे यांची एप्रिल 2024 मध्ये ओळख झाली. त्यांचा विश्वास संपादन करून कापरी याने नवी मुंबई येथील एम. जी. एम. मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. सगरे यांचा मुलगा निनाद सगरे याला एमडीएस (ओरल सर्जरी) पदवीसाठी 15 लाख रुपये भरून प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले.

डॉ. सगरे यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मे 2024 ते ऑगस्ट 2024 पर्यंत कापरी याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या खात्यावर रक्कम पाठवली. मात्र, कापरी याने निनाद याला एमडीएससाठी प्रवेश मिळवून दिला नाही. त्यामुळे डॉ. सगरे यांनी त्याच्याकडे दिलेले 15 लाख रुपये परत मागितले. मात्र, वेळोवेळी पाठपुरावा करूनही कापरी याने पैसे परत करण्यास टोलवाटोलवी केली. यामुळे डॉ. सगरे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अखेर डॉ. सगरे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कापरी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT