सांगली : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिका धारकांना देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ यावर्षी मात्र मिळणार नाही. गौरी-गणपती आणि दीपावलीच्या सणासाठी गेल्या पाच वर्षांपासून शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येत होता. यामध्ये शंभर रुपयात हरभराडाळ, रवा, साखर, खाद्यतेल प्रत्येकी एक किलोचा समावेश होता. यावेळी रेशनवर आता गव्हाबरोबरच ज्वारी देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
आनंदाचा शिधा मंजूर करण्यासाठी किमान दोन महिने ही प्रक्रिया सुरू करण्यात येते. जिल्हा पुरवठा विभागालाही सूचना येतात. शिधा वितरणासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येते. यावर्षी दिवाळी तोंडावर आली असतानाही यापैकी कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. यामुळे यंदाच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे सव्वाचार लाख कुटुंबीयांमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शंभर रुपयांमध्ये हरभराडाळ, रवा, साखर, खाद्यतेल प्रत्येकी एक किलोचे कीट देण्यात येत होते.
यामुळे गरजूंना मोठा दिलासा मिळत होता. त्याचबरोबर या महिन्यापासून रेशनवर ज्वारीचे वितरण करण्यात येणार आहे. गहू आणि ज्वारी पन्नास, पन्नास टक्के लाभार्थीना देण्यात येणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे रेशन आता प्राप्त झाले असून, याचे वितरणही सुरू करण्यात आले आहे.
सव्वाचार लाख कुटुंबांना मोफत धान्य...
जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्ड धारकांची संख्या 30 हजार 601 आहे. या कार्डधारकांना महिन्याला 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. त्याचबरोबर जिल्ह्यात 3 लाख 92 हजार 693 प्राधान्य कुटुंब योजना कार्डधारक आहेत. यातील कार्डधारकांना माणसी 2 किलो गहू, तर 3 किलो तांदूळ मोफत देण्यात येतो. एकूण 4 लाख 23 हजार 294 शिधापत्रिका धारकांना रेशनवरील धान्याचा लाभ देण्यात येतो. गव्हाबरोबर आता निम्मी म्हणजे माणसी एक किलो ज्वारी देण्यात येणार आहे.