सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News : अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी गोड

खात्यावर भाऊबीजेची रक्कम जमा ; जिल्ह्यातील सहा हजार कर्मचाऱ्यांना लाभ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दिवाळीच्या सणा निमित्त जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासनाकडून भाऊबीजेची भेट मिळाली आहे. जिल्ह्यातील सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. या माध्यमातून सुमारे सव्वा कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळत असून, त्यांची दिवाळी अधिक आनंदात साजरी होणार आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस गर्भवती, स्तनदा माता तसेच बालकांच्या पोषण आणि आरोग्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच कुपोषण रोखणे, बालकांचे आरोग्य आणि पोषणविषयक जनजागृती अशी कामे त्या नियमितपणे करतात. त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने पंधरवड्यापूर्वी भाऊबीज देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यातील सुमारे २ हजार ८०० अंगणवाड्यांमधील ५ हजार ६०० सेविका आणि मदतनीसांना या योजनेचा लाभ मिळत आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रातील सुमारे ४०० कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे. अशा एकूण ६ हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर भाऊबीजेची रक्कम जमा केली जात आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम जिल्हा किंवा तालुका कार्यालयांमार्फत वितरित न करता थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात आहे. त्यामुळे वितरणातील मध्यस्थी आणि विलंब टाळला जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही भाऊबीज दिलासादायक ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT