सांगली : सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन या संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांची अधिकृत सभा शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी होणार आहे. यामध्ये तीन रिक्त पदांच्या निवडी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये दिवंगत नेते मदन पाटील यांचीही एक जागा आहे. दरम्यान, ही सभा बेकायदेशीर आहे. त्यामुळे ती रद्द करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष संजय बजाज यांनी दिला आहे.
सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन या ट्रस्टची नोंदणी धर्मादाय कार्यालय येथे सन 1968 साली झालेली आहे. त्यानंतर या संघटनेमध्ये वाद झाल्याने प्रकरण धर्मादाय आयुक्तांच्याकडे गेले. 2000 साली धर्मादाय आयुक्त यांनी विश्वस्त कमिटी नेमणूक करून दिली. तत्कालीन विश्वस्त कमिटीमध्ये अध्यक्ष दिवंगत नेते व माजी मंत्री मदन पाटील, उपाध्यक्ष संजय बजाज, सेक्रेटरी रवींद्र बिनीवाले, जॉईंट सेक्रेटरी जयंत टिकेकर, खजिनदार चंद्रकांत पवार व काही विश्वस्त कमिटी सदस्य यांना निवडण्यात आले. यातील काही सदस्य मृत झालेले आहेत. या तीन सदस्य नियुक्तीसाठी बिनीवाले यांनी शुक्रवारी संचालक मंडळाची सभा बोलावलेली आहे. मात्र त्याला बजाज यांनी विरोध केला आहे.
याबाबत बिनीवाले म्हणाले की, घटनेतील तरतुदीनुसार आणि संचालक जयंत टिकेकर, सुधीर सिंहासने, संजीव शाळगावकर, अनिल जोब यांच्या मागणीनुसार अधिकृत नोटीस काढून सभा बोलावलेली आहे. सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या घटनेनुसार मीटिंग बोलवण्याचा अधिकार हा सेक्रेटरी यांनाच आहे. त्याचे पालन करून सेक्रेटरीने अधिकृत सभा बोलावलेली आहे, मदन पाटील यांच्या निधनानंतर काही संचालकांनी एक हाती कारभार करून क्रिकेटचे नुकसानच केलेले आहे. त्यांच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. क्रिकेटच्या वाढीच्या दृष्टिकोनातून संस्थेतील रिक्त पदावर काही मान्यवरांना घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालकांच्या बहुमताने करत आहोत.संस्था अध्यक्षाविना कारभार करत आहे. या संस्थेला अध्यक्षाची गरज आहे. तसेच सदस्यांच्यापण रिक्त पदाची जागा भरणे गरजेचे आहे, पण आम्ही ज्यांना संस्थेत घेत आहोत त्यांना काही असंतुष्ट संचालकांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे. काही संचालकांना आपले क्रिकेटमधील अस्तित्व व आपली एकाधिकारशाही संपुष्टात येईल याची जाणीव झाल्याने त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. सभेसाठी बहुमताने संचालकांचा पाठिंबा आहे. त्या जोरावर क्रिकेटच्या हिताच्या दृष्टीने मी योग्य ते निर्णय बहुमताने घेणार आहे. दरम्यान संजय बजाज म्हणाले, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सांगली जिल्ह्याचे अस्तित्व राहण्याकरता बर्याच क्रिकेट प्रेमींची व क्रिकेट खेळाडूंच्याकडून कायदेशीर व रितसर विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्याबाबत मागणी होत होती. परंतु संस्थेचे तत्कालीन सेक्रटरी रवींद्र बिनीवाले यांना एक हाती ट्रस्टचा कारभार करणे आवडत असल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारे विश्वस्तांची निवड करण्याबाबत कार्यवाही केलेले नाही. त्यामध्ये बरेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे दिसून येत होते.
क्रिकेट खेळाडूंचे नुकसान होऊ लागलेले होते. खेळाडू, क्रिकेट प्रेमी व कमिटी सदस्य पदाधिकारी यांच्या संमतीने व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सांगली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे विश्वस्त व पदाधिकारी कायदेशीर कारभार व व्यस्थापन करीत आहेत. क्रिकेट क्षेत्रात गोंधळ निर्माण करण्याच्या उद्देशाने विश्वस्त, कमिटी सदस्य व पदाधिकारी यांना विश्वासात न घेता बिनीवाले हे कायदेशीर सेक्रेटरी नसताना त्यांना सभा घेणेचा अधिकार नसताना त्यांनी सभेचे आयोजन केले आहे. बिनीवाले हे सेक्रटरी नाहीत. त्यांना कोणतीही सभा घेण्याच्या अधिकार नाही. सभा घेऊन क्रिकेट क्षेत्रात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे संस्थेचे, खेळाडूंचे व क्रिकेट प्रेमींचे अतोनात नुकसान होऊन भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे. बिनीवाले यांनी सभा घेऊन राजकीय व्यक्तींची निवड केल्यास ती निवड कायदेशीर विश्वस्त सभासद यांना मान्य नसल्याने ट्रस्ट, कायदेशीर विश्वस्त, सभासद यांनी अ राजकीय आंदोलन करून, उपोषणाचा इशाराही दिलेला आहे. त्यामुळे भविष्यातील वाद टाळण्याच्या दृष्टीने बिनिवाले यांच्याशी कोणीही कोणत्याही प्रकारे संधान साधू नये. यावेळी माजी महापौर किशोर शहा चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रिकेट संघटनेच्या 11 जणांच्या समितीमध्ये तीन जागा रिक्तआहेत. या तीन जागांवर उद्याच्या सभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार व मारुती गायकवाड यांची निवड करण्यात येणार आहे. त्याला संजय बजाज यांचा विरोध आहे.