सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित १६ कोटी ५९ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमितता प्रकरणी आजी-माजी संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडली. या प्रकरणी नेमण्यात आलेले चौकशी अधिकारी तथा निवृत्त जिल्हा न्यायाधीश एम. आर. मखरे यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीत, दोषारोप नोटीस बजावण्यात आलेल्या आजी-माजी संचालकांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी सविस्तर म्हणणे व स्पष्टीकरण सादर केले. या सुनावणीनंतर आता या चौकशीची पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.
बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात विविध खर्चाच्या व्यवहारांमध्ये अनियमितता होऊन बँकेचे सुमारे १६ कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशीत नोंदवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीत आजी-माजी संचालक, तत्कालीन अधिकारी तसेच विद्यमान अधिकाऱ्यांसह तब्बल ५७ जणांना दोषारोप नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला उत्तर देताना आजी-माजी संचालकांनी वकिलांमार्फत आपली भूमिका मांडत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
या प्रकरणात प्रामुख्याने विकास सेवा संस्थांसाठी केलेली संगणक खरेदी, बँकेच्या विविध शाखांमधील फर्निचर खरेदी आणि जाहिरात खर्चात झालेली अनियमितता, या व्यवहारांवर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, हे सर्व व्यवहार नियमानुसारच झाल्याचा दावा संचालकांनी आपल्या स्पष्टीकरणात केला आहे.
शासनाने नियुक्त केलेले चौकशी अधिकारी एम. आर. मखरे सादर झालेल्या सर्व स्पष्टीकरणांचा आणि कागदपत्रांचा अभ्यास करणार असून, १२ ऑगस्टच्या सुनावणीनंतर या चौकशीचा अंतिम अहवाल आणि पुढील कायदेशीर दिशा निश्चित होणार आहे.