माडग्याळ चौगुले वस्तीतील अंगणवाडीची दुरवस्था 
सांगली

Sangli News : माडग्याळ चौगुले वस्तीतील अंगणवाडीची दुरवस्था

चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर : दरवाजे नाहीत, छताला गळती

पुढारी वृत्तसेवा

वसंत सावंत

जत : माडग्याळ येथील चौगुले वस्तीवरील अंगणवाडी केंद्र क्रमांक २६ ची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, येथे शिक्षण घेणाऱ्या ३४ चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवाजे व खिडक्या तुटलेल्या, पावसाळ्यात गळणारे छत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे आणि वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे अंगणवाडीचे कामकाज अडचणीत आले आहे.

अंगणवाडीच्या इमारतीचे मुख्य दरवाजे तुटून पडले असून, अनेक ठिकाणी केवळ चौकटी उरल्या आहेत. खिडक्यांनाही दरवाजे नसल्यामुळे वारा, पाऊस आणि धूळ थेट वर्गात येते. पावसाळ्यात छताला मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने वर्गात पाणी साचते आणि मुलांना सुरक्षितपणे बसणेही कठीण होते. त्यामुळे चिमुकल्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

अंगणवाडीत यापूर्वी चोरीची घटना घडली होती. त्यामध्ये गॅस सिलिंडर, स्वयंपाकाची भांडी, वजन-काटा तसेच इतर साहित्य चोरीला गेले होते. त्यानंतर नवीन साहित्य उपलब्ध झाले असले तरी, ते सुरक्षित ठेवण्यासाठी इमारतीत जागा नसल्याने तांदूळ, डाळ, तेल, चटणी आणि इतर साहित्य भाड्याच्या खोलीत ठेवावे लागत आहे. त्यासाठी दरमहा एक हजार रुपयांचे भाडे मोजावे लागत आहे. सुरक्षित स्वयंपाकघर नसल्याने अनेकदा चिमुकल्यांचा खाऊ चुलीवर तयार करावा लागतो.

अंगणवाडी परिसरातील बोअरवेलची मोटर, पेटी आणि वायर केबल चोरीला गेल्यामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. हापसाही नादुरुस्त झाला असून, पिण्याचे आणि स्वयंपाकासाठीचे पाणी विहिरीतून आणावे लागत आहे. शौचालयाचे दरवाजे तुटले आहेत.

अंगणवाडी सेविका हाफिजा खाटीक यांनी सांगितले की, इमारतीला पावसाळ्यात गळती लागते. कूपनलिका बंद असल्याने पाणी विहिरीतून आणावे लागते. साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी भाड्याने खोली घ्यावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने इमारतीची दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT