सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. स्मारकाच्या उर्वरित कामाच्या निधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून तातडीने प्रस्तावही मागवला.
जयश्री पाटील यांनी मंगळवारी मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजीमंत्री विनय कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील उपस्थित होते. सांगलीत स्टेशन चौकात वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाचे काम अपूर्ण आहे. स्मारकाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. पुरेसा निधी न मिळाल्याने स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. स्मारकाच्या उर्वरित कामांसाठी 8 कोटी रुपयांची गरज आहे. शासनाकडून हा निधी मिळावा, अशी मागणी जयश्री पाटील यांनी केली. वसंतदादांच्या स्मारकाचे रखडलेले काम पूर्ण केले जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. निधीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्तावही मागवला आहे.
वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी स्मारक समितीत जयश्री पाटील यांचाही समावेश करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितले.