जयंत पाटील (File Photo)
सांगली

Jayant Patil| दुष्काळी मदत दिवाळीपूर्वी खात्यामध्ये जमा करा

आ. जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली प्रतिशेतकरी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच सरसकट शेतकरी कर्जमाफी लागू करावी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही तातडीने वितरित करावे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

यंदा राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, रब्बी हंगामाचीही कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रतिशेतकरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे, मात्र अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असल्याने ही मदत तातडीने वितरित करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्ती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. याशिवाय, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही प्रलंबित असून, ते सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करावे, अशी आग्रही मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.

दुष्काळी मदत, कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदान या तिन्ही प्रमुख मागण्यांची दिवाळीपूर्वी अंमलबजावणी करून राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा द्यावा, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT