सोशल मीडियावरील चारित्र्यहननी पोस्ट्स डिलिट  
सांगली

Sangli News : सोशल मीडियावरील चारित्र्यहननी पोस्ट्स डिलिट

दै. ‘पुढारी’च्या ‘काल काय ऐकलं...'ची सकारात्मक दखल

पुढारी वृत्तसेवा

विजय लाळे

विटा : कधी नावाने तर कधी फेक अकाउंट्सवरून सोशल मीडियावर सुरू असलेले विट्यातील आरोप-प्रत्यारोप व एकमेकांची उणीदुणी काढण्याच्या प्रकारांवर दैनिक पुढारीच्या ‘काल काय ऐकलं ते खरं हाय का?’ या सदरातून उपरोधिक भाष्य केले होते. याची शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि भाजपचे नेते व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सकारात्मक दखल घेतली आहे. सोशल मीडियामधल्या वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या सर्व पोस्ट्स डिलिट करून असे प्रकार थांबवण्याचे आवाहन दोघांनीही कार्यकर्त्यांना केले.

खंडाळा तालुक्यातील बोरी आणि सुखेड गावांमध्ये नागपंचमीच्या दुसऱ्यादिवशी साजऱ्या होणाऱ्या ‘बोरीच्या बार’चा संदर्भ घेत, सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर या सदरातून 'सब घोडे बारा टक्के' या शीर्षकासह भाष्य केले होते. आमदार बाबर आणि पाटील या परस्परविरोधी गटांच्या समाजमाध्यमांवर चाललेल्या काही टीका-टिपण्यांनी सामाजिक वातावरण बिघडत चालले होते. यावर ‘पुढारी’च्या ‘काल काय ऐकलं ते खरं हाय का’ या सदरात भाष्य केले होते.

या पार्श्वभूमीवर काल दुपारी वैभव पाटील यांनी आपल्या पोस्टमधून, राजकीय मतभेद असले तरी मनभेद निर्माण होऊ नयेत, वैयक्तिक बदनामी करणाऱ्या पोस्ट टाळाव्यात आणि आक्षेपार्ह पोस्ट डिलिट कराव्यात, असे आवाहन केले. विशेष म्हणजे, खानापूर तालुक्यासमोर दुष्काळाचे संकट असताना शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सोशल मीडियावरील ऊर्जा खर्च करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर आमदार सुहास बाबर यांनीही सायंकाळच्या सत्रात काही दिवसांपासून समाजमाध्यमांतून माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. राजकारणात, समाजकारणात मी अनिलभाऊंचा वारसा व विचार जपण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करतो. कधीही कसलाही आरोप १२ वर्षांच्या राजकीय आयुष्यात माझ्यावर झाला नाही. मीसुद्धा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान विरोधकांच्या चुकीच्या कारभारावर टीका करताना पातळी घसरू दिली नाही. मात्र काही दिवसांपासून फेक अकाउंटवरून मला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी खोट्या व निराधार पोस्ट टाकल्या गेल्या. तरीसुद्धा आम्ही आमचा तोल ढळू दिला नाही. काल कोणीतरी अज्ञाताने एका निराधार माहितीच्या आधारावर पोस्ट टाकली आणि एकमेकांना खालच्या पातळीवरती येऊन बोलू लागल्यानंतर आपल्या गावातील सामाजिक सलोखा राखला जावा, यादृष्टीने व ज्येष्ठांच्या सल्ल्याने समाजमाध्यमांवरील सर्व पोस्ट काढून टाकाव्यात, अशी विनंती करतो आणि येथून पुढे माझ्या बाजूने सकारात्मक बाजू मांडली जावी, अशी विनंती करतो.

एका उपरोधिक किस्स्यातून मांडलेल्या सामाजिक आशयाला राजकीय नेत्याने सकारात्मक प्रतिसाद देणे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकास कामांची स्पर्धा व्हावी, व्यक्तीपेक्षा प्रश्नांना महत्त्व मिळावे आणि एकमेकांवर टीका करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष व्हावा. राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर सर्वांनी एकत्र यावे, हाच यानिमित्ताने सकारात्मक संदेश पुढे आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT