सांगली : करजगी (ता. जत) येथे दीड वर्षापूर्वी घडलेल्या चारवर्षीय बालिकेवर बलात्कार करून खुनाच्या गंभीर प्रकरणात नराधम पांडुरंग सोमन्ना कळ्ळी (वय ४५, रा. करजगी) याला शनिवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. नराधम पांडुरंग कळ्ळी याने यापूर्वीही साथीदारासह एका बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. या बद्दल त्याच्यावर पोलिसात गुन्हा नोंद होता. परंतु तो पुराव्याअभावी निर्दोष सुटला होता. एका गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर त्याने चांगल्या प्रकारे जीवन जगणे गरजेचे होते. याचा संदर्भ देत सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये नराधमाला ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ तत्त्वाच्या आधारावर सर्वात मोठी शिक्षा देणे आवश्यक आहे. परंतु फाशीपेक्षा मोठी कोणतीही शिक्षा नाही. म्हणून त्याला किमान फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद केला.न्यायालयानेही हा निर्णय हा नैतिकतेवर आधारित नसून गुणदोषावर असल्याचे नमूद करत नराधम पांडुरंग कळ्ळी याला फाशीची शिक्षा सुनावली.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलीची मैत्रीण असलेली चुलत बहीण, साक्षीदार राजकुमार रेवाप्पा मेत्री यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने वैद्यकीय पुरावा देखील महत्त्वपूर्ण ठरवला. यामध्ये गुन्हा घडला त्या ठिकाणचे व कपड्यावरील आरोपीचे व मृत मुलीचे रक्ताचे नमुने, सिमन्स, डी.एन.ए. तपासणी अहवाल आदी वैद्यकीय पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरला.
याकामी सरकार पक्षाच्यावतीने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे २३ न्यायनिवाडे दाखल करण्यात आले. यापैकी १० निवाडे फाशीची शिक्षा का द्यावी, याबाबतचे होते. सरकार पक्षाला पैरवी कक्षातील सहायक पोलिस निरीक्षक मुदतसर, संजय कापूरकर, उमदी पोलिस ठाण्याचे शिवाजी माळी, सांगली येथील वंदना मिसाळ व रेखा खोत यांनी, तसेच मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.
जिल्ह्यातील नववी फाशी
जिल्ह्यात आतापर्यंत ९ खटल्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. यापैकी एकाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कमी करून जन्मठेप केली. सांगली येथे पोक्सो विशेष न्यायालय सुरू झाल्यानंतर तसेच नवीन इमारत सुरू झाल्यानंतर ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे, तर सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी घेतलेली ही दुसरी फाशीची शिक्षा आहे.
मृतदेह पोत्यात भरून ठेवला
आरोपीने बलात्कार केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पीडित मुलीचा मृतदेह पोत्यात भरून ते पोते घरातील लोखंडी पेटीत झाकून ठेवले होते व काही घडलेच नाही, अशा अविर्भावात तो राहिला. परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडले व गुन्ह्याची कबुली दिली.
चिमुकलीला न्याय : मुलीचे वडील
माझी गेलेली मुलगी परत येणार नाही. परंतु समाजामध्ये अन्य कोणाच्याही मुलीवर असा प्रसंग येऊ नये. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे चिमुकलीला न्याय मिळाला आहे. अशा नराधमाला फाशीची शिक्षाच योग्य आहे, अशी प्रतिक्रीया पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली.