मूक-बधिर सत्यजितनं नेमबाजीत मिळवले राष्ट्रीय पदक Pudhari Photo
सांगली

सांगली : मूक-बधिर सत्यजितनं नेमबाजीत मिळवले राष्ट्रीय पदक

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

मूक-बधिर सत्यजितनं इंडिया ओपन कॉम्पिटिशन रायफल पिस्टल इव्हेंट्स 2024 मध्ये राष्ट्रीय रौप्यपदक पटकावलं. सत्यजित विकास पाटील, (वय 24, राहणार ढवळवेस, तासगाव) असं त्याचं नाव. जुळी मुलं जन्माला आली म्हणून आई-वडील खूश होते. बाळांचं नामकरण झालं, मात्र त्यातील एक बाळ रडत नव्हतं, त्याला हाक मारली तरी ऐकू येत नव्हतं. स्थिती गरिबीची, पण वडिलांनी हार मानली नाही. दवाखाने केले आणि निदान झालं- एका बाळाला बोलता, ऐकता येत नाही. सत्यजितच्या नजरेत मात्र ताकद होती. त्याच्या आई-वडिलांनी ते जाणलं.

तासगाव येथील साधनामूक-बधिर शाळेत पहिली ते चौथी आणि त्यानंतर वारणाली येथील संस्थेत पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. वडिलांच्या पानपट्टीत तो मदत करायचा. आजही करतोय. दीड वर्षापूर्वी अनिकेत भोसले या मित्रासोबत सत्यजित सांगलीत गेला. अनिकेत सांगलीमध्ये रायफल शूटिंगचा सराव करायचा. ते बघून सत्यजितलाही त्यात रस वाटू लागला. मोठा भाऊ विश्वजित आणि वडिलांना त्यानं हे सांगितलं. दोघांनीही त्याला पाठबळ दिलं. त्यानं रायफल शूटिंगसाठी सराव सुरू केला.

सहा महिन्यांपासून सांगली येथे हेलिओस शूटिंग अकॅडमीमध्ये तो सराव करतोय. मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप 2024 मध्ये 10 मीटर एअर पिस्टल या प्रकारात 400 पैकी 347 गुण मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. अवघ्या काही गुणात पदक मिळालं नाही. त्यानं खचून न जाता जोमाने सराव केला. 28 ऑगस्टरोजी गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यानं सहभाग घेतला. 10 मीटर एअर पिस्टल (मूक-बधिर गट) मध्ये त्यानं 400 पैकी 348 गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय रौप्यपदक प्राप्त केलं. या यशाबद्दल आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सत्यजितची भेट घेऊन कौतुक केलं. त्याला आर्थिक मदत केली.

सुवर्णपदक आणण्याचा मानस

हेलीओस अकॅडमीचे सूरज अरवत्तू, विघ्नेश यादव व श्रेयस उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजित सराव करतोय. सध्या तो 2025 मध्ये टोकियो (जपान) येथे होणार्‍या मूक-बधिर ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करत असून सुवर्णपदक आणण्याचा मानस त्यानं व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT