Sangli Politics | डांगेंचा भाजप प्रवेश; जयंत पाटील गटाला धक्का? File Photo
सांगली

Sangli Politics | डांगेंचा भाजप प्रवेश; जयंत पाटील गटाला धक्का?

स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलणार

पुढारी वृत्तसेवा
मारुती पाटील

इस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे तसेच त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष चिमण डांगे व माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार जयंत पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जातो. या पक्षप्रवेशामुळे वाळवा तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदलू शकतात.

मुंबईत वर्षा बंगल्यावर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, तसेच अ‍ॅड. चिमण डांगे, विश्वनाथ डांगे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. येत्या आठवडाभरात समर्थक कार्यकर्त्यांशी चर्चा करून जाहीर पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. अण्णासाहेब डांगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, नंतर जनता पक्ष, नंतर भाजप असा राजकीय प्रवास राहिला. भाजपनंतर त्यांनी स्वतःचा लोकराज्य पक्ष स्थापन केला. त्यानंतर ते तेव्हा एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता ते पुन्हा भाजपमध्ये म्हणजे घरवापसी करतील, अशी शक्यता आहे.

1967 पासून जनसंघाच्या माध्यमातून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. 1980 साली भाजप पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय झाले. ते अठरा वर्षे विधानपरिषदेचे सदस्य होते. युती शासनाच्या काळात 1995 साली त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणूनही काम केले. ते विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी प्रभावी कामकाज केले. 2002 मध्ये त्यांनी भाजप पक्षातून बाहेर पडत लोकराज्य नावाने स्वतंत्र राजकीय पक्ष सुरू केला. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर 2006 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अलीकडच्या काही काळात ते राष्ट्रवादी पक्षातही नाराज असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजप नेत्यांशी त्यांची सलगी वाढली होती. त्यामुळे डांगे राष्ट्रवादी पक्ष सोडणार हे जवळजवळ निश्चित होते.

महिन्याभरापूर्वी चौंडी येथे झालेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. याचवेळी डांगे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. त्यांचे पुत्र अ‍ॅड. चिमण डांगे राष्ट्रवादीतून इस्लामपूरचे नगराध्यक्षही झाले होते. तसेच विश्वनाथ डांगे व चिमण डांगे हे अनेक वर्षे नगरसेवक आहेत. शहर व परिसरातील प्रभागात डांगे गटाचे वर्चस्व आहे. यापूर्वी शहर सुधार समितीच्या माध्यमातून डांगे व स्वर्गीय नानासाहेब महाडिक गटाने नगरपालिका निवडणुकांत एकत्रित काम केले आहे. त्यामुळे डांगे बंधू भाजपमध्ये आले तर भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व राहुल महाडिक यांच्याशी त्यांचे सूत जुळू शकते. तसेच इस्लामपूर शहर व वाळवा तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढू शकते.

जयंत पाटील विरोधकांची ताकद वाढली

स्थानिक स्वराज्य संस्था व पालिका निवडणुकीच्या तोंडावर डांगे बंधू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर शहरासह तालुक्यात आमदार जयंत पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जातो. यापूर्वी आ. जयंत पाटील गटाचे माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे, जयवंत पाटील तसेच माजी नगरसेविका मनीषा पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विरोधकांची ताकद वाढू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT