सांगली : दुग्धजन्य उत्पादनांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादक असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला आहे.
याबाबत संघटनेच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या 5 वर्षामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन खर्चामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, वीज, वाहतूक, पॅकिंग व मजुरी यांचे वाढलेले दर यांसारख्या घटकांमुळे आपल्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्याचबरोबर क्रीम, बटर यांचा बाजारात तुटवडा असल्याने खरेदी दर रोज वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व व्यापारी सभासदांना योग्य दर मिळावा, यासाठी दुग्धजन्य पदार्थांच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने लगेचच रविवारपासून दुग्धजन्य उत्पादनांच्या विक्री दरामध्ये वाढ लागू करण्यात आली आहे.
उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे तीन ते चार टक्के दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ अपरिहार्य होती. पाच वर्षानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. ग्राहकांकडून सहकार्य अपेक्षित आहे.- चेतन दडगे, अध्यक्ष, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादक असोसिएशन