पलूस; पुढारी वृत्तसेवा : पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथील कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर सायंकाळी पाणी पिण्यासाठी गेलेल्या घोड्यावर मगरीने अचानक झडप मारून पाण्यात ओढून नेले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उदय मारुती मोरे (रा.चोपडेवाडी) यांचा मुलगा आर्यन हा घोड्याला घेऊन चरण्यासाठी कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर गेला होता. घोडा चरत-चरत नदीकाठावर पाणी पिण्यासाठी गेला. त्यावेळी पाण्यामध्ये असलेल्या मगरीने घोड्यावर झडप मारली. काही समजायच्या आत घोड्याला पाण्यात ओढून नेले. यावेळी हातात घोड्याची दोरी घेऊन उभे असलेले उदय मोरे यांनी घोड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु मगरीच्या ताकतीपुढे त्यांचे काही चालले नाही. त्यावेळी आजूबाजूला मच्छिमारी करणार्या लोकांनी आरडा-ओरडा करून घोड्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु मगरीने घोड्याला नदीपात्रात ओढून नेले. रात्री उशिरापर्यंत येथील नागरिकांनी घोड्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. या भागात असणार्या मगरीने याअगोदरही प्राण्यांसह महिलांवर हल्ला केला आहे. वनविभागाने या मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.