सांगली : कळंबा कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका गुन्हेगाराच्या स्वागतासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास एकत्र जमून आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा करणे त्याच्या समर्थकांना महागात पडले. सांगली शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती अशी, गुन्हेगार वैभव नंदू साळसकर (रा. गवळी गल्ली, सांगली) हा कळंबा कारागृहातून जामिनावर बाहेर आला आहे. तो दुपारच्या सुमारास सांगलीत आल्यावर त्याच्या समर्थकांनी बेकायदा जमाव जमवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा, दंगा करून फटाके फोडले. यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा चौदाजणांवर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अभिजित नंदू साळसकर, साहिल सय्यद, अमित ऊर्फ गोट्या कांबळे, गणेश पवार, सूरज माने, अक्षय गायकवाड (सर्व रा. गवळी गल्ली, सांगली) आणि आकाश घबाडे (रा. सांगलीवाडी) यांच्यासह अनोळखी 5 ते 6 जणांचा समावेश आहे. याबाबत पोलिस कर्मचारी विशाल कोळी यांनी फिर्याद दिली आहे.