माधवनगर ः राजकीय आश्रय, व्यसनाधीनता, बेरोजगारी यामुळे माधवनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी शुक्रवार पेठेतील गेली अनेक वर्षे बंद असलेली पोलिस चौकी पूर्ववत त्याच क्षमतेने सुरू करण्याची मागणी होत आहे.
पूर्वी संजयनगर पोलिस ठाणे अस्तित्वात येण्यापूर्वी माधवनगर गाव सुरुवातीला मार्केट यार्ड व नंतर विश्रामबाग पोलिस ठाण्याला जोडले होते. लोकांची सोय म्हणून सुमारे 40 वर्षांपूर्वी माधवनगर पोलिस चौकी सुरू करण्यात आली आहे. या चौकीमध्ये एक फौजदार व चार ते पाच पोलिस कार्यरत असायचे. पंचशीलनगर, साखर कारखाना, संपत चौक, गोसावी गल्ली, औद्योगिक वसाहत, माधवनगर हा भाग या चौकीच्या अधिपत्याखाली येत होता. या चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्याची सोय नसली तरी, तातडीने गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलिस तातडीने पोहोचत होते. शिवाय किरकोळ भांडणे, मारामार्या तडजोडीने पोलिस चौकीतच मिटविल्या जायच्या.
संजयनगर पोलिस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर माधवनगर गाव या पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली आले. संजयनगर पोलिस ठाणे सुरू झाल्यानंतर देखील काही दिवस माधवनगर पोलिस चौकी सुरू होती. परंतु कालांतराने हळूहळू चौकी बंद करण्यात आली आहे. विशेषतः कोरोना काळात वाहने व प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी गावाबाहेरील जुन्या जकात नाक्याजवळ छोटे पोलिस निवारा केंद्र सुरू करण्यात आले व गावातील पोलिस चौकीला टाळे लागले. कोरोना काळ संपला तरी चौकी काही सुरू झाली नाही.
सुमारे साडेतीन कि.मी. अंतरावर संजयनगर पोलिस चौकी असल्याने गावात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. काही फाळकूटदादा व्यापार्यांना दमदाटी करून, बदनामीची व तक्रार करण्याची भीती घालून खंडणी गोळा करत असल्याचा आरोप आहे. तरुण व्यसनाच्या आहारी गेल्याचे दिसतात. गावातील काही भागात गांजा व नशेच्या गोळ्या तसेच गुटखा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे. या नशेबाजांमुळे गावात वारंवार मारामारी व गुंडगिरीचे प्रकार वाढले आहेत. यातूनच दोन गटात वर्चस्ववादाचे प्रकार घडू लागलेले आहेत. माधवनगर व परिसरातील गुन्हेगारी कमी होवून हा परिसर पूर्वीसारखा शांत राहणेसाठी माधवनगरची पोलीस चौकी पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने सुरु करणेची मागणी तेथील नागरिक व व्यापारी करीत आहेत.
एक फौजदार व पाच पोलिसांसह माधवनगरची पोलिस चौकी पूर्ववत सुरू होणे आवश्यक. चौकी बंद व नाक्यावर पोलिस वाहने तपासतात, हे चित्र बंद होणे आवश्यक. व्यापार्यांना फाळकूटदादांचा त्रास बंद होणे आवश्यक.
सध्या चौकीच्या बाहेरील शेडमध्ये दुचाकी वाहनांचे पार्किंग मात्र जोरात सुरू आहे. 26 जानेवारी व 15 ऑगस्ट वगळता पोलिस चौकीजवळ पोलिस दिसत नाहीत. नुकत्याच झालेल्या वादळी वार्यामध्ये पोलिस चौकीचा फलक उडून गेला आहे. पोलिस चौकीच्या आसपासची दुकाने बंद झाल्यावर रात्री नऊनंतर या चौकीसमोरील परिसर ’अंधारमय’ होत असतो. या काळात या परिसराचा उपयोग मद्यपानासाठी व अनैतिक कामांसाठी होताना दिसतो.