कडेगाव शहर/वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ हिसकावून नेणाऱ्या दाम्पत्याला चिंचणी-वांगी पोलिसांनी शिताफीने अटक केली. तीन गुन्हे उघडकीस आणत 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. प्रमोद शंकर माळी व रेश्मा राजाराम साठे (मूळ रा. बामणी, ता. खानापूर, सध्या रा. वांगी) अशी संशयितांची नावे आहेत.
वांगी येथील शालन ज्ञानू माळी (वय 75) या 14 फेब्रुवारीरोजी दुपारी घरासमोर बसल्या असताना, अनोळखी दाम्पत्य पाणी पिण्याचा बहाणा करून घरात आले. संधी साधून त्यांनी शालन यांची सोन्याची बोरमाळ हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी चिंचणी-वांगी पोलिसात गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान उपनिरीक्षक योगेश शेलार व विक्रम कुंभार यांना प्रमोद माळी व रेश्मा साठे यांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान प्रमोद माळी याने कडेगाव व विटा पोलिस ठाण्याच्य हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचेही निष्पन्न झाले. या कारवाईत एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रमोद माळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, खंडणी व मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल घुगे, उपनिरीक्षक योगेश शेलार, विक्रम कुंभार, विनायक सावळगे, संपत जाधव, मनोज जाधव, सतीश पाटील, प्रवीण मलमे, संकेत सावंत, योगेश माळी, शिवाजी हिप्परकर, वैभव गर्जे, योगीता आरबुने तसेच सायबर पोलिसांच्या पथकाने पार पाडली.